मुंबई : हिंदू मुलांचे धर्मांतर करून मोबाईल जिहादसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंब्रा येथील शाहनवाज मकसूद खानला सोमवारी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायाधीशांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. प्रथम त्याला न्यायाधीशांनी नाव आणि वय विचारले. त्यावर त्याने स्वतःचे नाव आणि वय बरोबर सांगितले. दरम्यान, काही वेळानंतर तुला कोणत्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे माहीत आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शाहनवाज म्हणाला, ऑनलाईन गेमिंग करताना मी धर्माविषयी चॅटिंग करत होतो. त्यामुळे मला अटक केली असल्याची कबुली शहानवाज याने दिली.
ऑनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांचे धर्मांतर करून मोबाईल जिहाद पुकारणारा मुंब्रा येथील मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला सोमवारी ठाणे पोलिसांनी गाझियाबाद पोलिसांच्या हवाली केले. सोमवारी सकाळी शाहनवाझ याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांच्या प्रवासासाठी आवश्यक असलेला ट्रांझिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर गाजियाबाद पोलिसांचे पथक त्याला घेऊन रस्तेमार्गे गाजियाबादला रवाना झाले. यावेळी गाझियाबाद पोलिसांनी ठाणे पोलिसांचे विशेष कौतुक केले.
मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्याने ४०० मुलांचे धर्मांतर करण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला मुंब्र्यातील २३ वर्षीय शाहनवाज खान उर्फ बद्दो याच्या मागावर उत्तरप्रदेश राज्यातील गाझीयाबाद पोलिसांचे पथक होते. गाझियाबाद पोलिसांनी मुंब्य्रात ठिकठिकाणी छापे मारून शाहनवाज खान या आरोपीचा शोध घेतला. परंतु वारंवार गुंगारा देणारा शाहनवाज खान हाती लागत नव्हता. त्याच्या मुंब्र्यातील देवरीपाडा येथील शाजिया बिल्डिंगमधील घरावर देखील पोलिसांनी करडी नजर ठेवली होती.
ठाणे पोलीस उपायुक्त कार्यालयात शाहनवाज याच्या आईलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तसेच, या धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी शहानवाजचे बँक खाते गोठवले होते. यासाठी ठाणे पोलिसांची दोन पथके शाहनवाज याच्या मागावर होती. अखेर, आरोपी शहानवाज हा मुंबईतील वरळी या ठिकाणी असल्याची माहिती मिळताच, रविवारी त्या ठिकाणी पथक गेल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अलिबागला पोहचल्याचा सुगावा पथकाला लागला.
त्यानुसार, रविवारी दुपारी अलिबाग येथील एका कॉटेज लॉजमधून शाहनवाज त्याच्या भावासोबत मिळून आला. त्याला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर गाजियाबाद पोलिसांनी कायदेशीररित्या त्याची अटकेची प्रक्रिया पार पाडली. तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याकडील गुन्ह्यात वापरलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले.
सोमवारी सकाळी त्याला ठाणे द्वितीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांच्या प्रवासासाठी आवश्यक असलेला ट्रांझिट रिमांड मंजूर केला. गाजियाबाद पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन गाजियाबादला रवाना झाले. गाजियाबाद पोलिसांना सर्वतोपरी मदत केल्याने गाझियाबाद पोलिसांनी ठाणे पोलिसांचा कौतुक केले. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास गाजियाबाद पोलीस करणार असल्याचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले.