मविआच्या मंचावरून शिवरायांचे वंशज शाहू महाराजांचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले…
Shahu Maharaj in MVA Jodo Maro Andolan : शिवपुतळा कोसळल्या प्रकरणी शिवरायांचे वंशज शाहू महाराजांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा कठोर शब्दात त्यांनी निषेध केलाय. 'जोडे मारो' आंदोलनादरम्यान शाहू महाराज छत्रपती काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...
सिंधुदुर्गातील मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यानंतर महाविकास आघाडीने आज मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती देखील या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पुतळा कोसळण्याच्या घटनेबाबत निषेध व्यक्त केला. शिवरायांचा पुतळा कोसळणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं शाहू महाराज म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मान राखला गेला पाहिजे. ज्याने तो पुतळा बसवला त्याची चौकशी झाली पाहिजे, असं शाहू महाराज म्हणालेत.
शाहू महाराज काय म्हणाले?
मालवणमध्ये काय झालं, हे आपण पाहिलं. भारताच्या बाहेरही लोक संतप्त झाले आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांनी हे केलं त्यांना कोणीही मोकळं सोडणार नाही. महाराष्ट्रात हा संताप झाला आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राचा मान ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान आपण राखला पाहिजे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हा पुतळा ज्याने बसवला, त्यांचा निषेध केला पाहिजे, असं शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
मविआचं ‘जोडे मारो’ आंदोलन
शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं गेलं. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा झाला. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे काही वेळ मोर्चामध्ये चालले. त्यानंतर गाडीतून हे दोघे गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले. गेट वे ऑफ इंडिया परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत या मोर्चाचा समारोप झाला. यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संबोधित केलं. शाहू महाराज छत्रपती यांनीही संबोधित केलं. त्यांनी शिवरायांचा पुतळा कोसळण्याचा निषेध केलाय.
वाऱ्यामुळे पुतळा पडला. असं सांगितलं जातं. गेटवेवर हा पुतळा आहे. 50 वर्षापासून आहे. पण तो अजूनही टिकून आहे. राज्यातही असे अनेक पुतळे आहेत. मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमीचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली, अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली आहे.