बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, सत्ताधारी आणि गृहविभाग…
Sharad Pawar About Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. परिवर्तन करणं आवश्यक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. वाचा सविस्तर...
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री हत्या झाली आहे. मुंबईतील वांद्रे भागात बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या हत्येनंतर आता मुंबईत दहशतीचं वातावरण आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. मला त्याबाबतची पुरेशी माहिती नाही. गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल असं भाष्य आम्ही करणार नाही. याची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. त्यांना डिटेल देता येत नाही. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही, असं शरद पवार म्हणाले. मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
निवडणुकीबाबत शरद पवार काय म्हणाले?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. दिवस फार थोडे राहिले आहे. दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागेल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. निवडणुकीची प्रक्रिया संपल्याशिवाय यांना उत्तर मिळणार नाही. लोकांसमोर जाणं आणि लोकांची सुटका करायची आहे. सत्तेत परिवर्तन करणं हाच पर्याय आहे. त्यासाठी लोकांनी साथ द्यावी, असं शरद पवार म्हणालेत.
नरेंद्र मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी या ठिकाणी आले होते. त्यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’चं उद्घाटन झालं. यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान आले. आणि बंजारा समाजाबाबत बोलले. पोहरादेवीला. त्यांनी एक विधान केलं. बंजारा समाजासाठी काँग्रेसने आणि यापूर्वीच्या सरकारने काहीच संधी दिली नाही. या राज्याचे ११ वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री, तीन वर्ष सुधाकरराव मुख्यमंत्री होते. मनोहर नाईक मंत्रिमंडळात होते. काँग्रेसने या समाजाला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. बंजारा समाज कृतज्ञता व्यक्त करतो. पण मोदी येऊन चुकीची माहिती देतात. पंतप्रधानपद ही एक संस्था आहे. पण त्यांची प्रतिष्ठा राखली जात नाही, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने काही महामंडळं नेमली होती. त्याची उपयुक्तता नाही. त्याचा प्रशासकीय खर्च आहे. काही महामंडळं रद्द करण्याचा निकाल सरकारने घेतला आहे. हा अनुभव नियोजन खात्याने भारताच्या नेतृत्वाला लक्षात आणून दिला आहे. त्यानंतरही रोज नवीन महामंडळ केली जात आहे, त्याला काही अर्थ नाही. ज्या सामाजिक वर्गाचा उल्लेख केला जातो, त्यांच्या मनात नैराश्य येईल असं वाटतंय, असंही पवार म्हणाले.