Sharad Pawar On Raj Thackeray : राष्ट्रवादी हा जातीय पक्ष आहे? राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना पवारांकडून मुंडे-भुजबळ-पिचड नावाची ढाल
विविध जातीच्या नेत्यांना जबाबदारीच्या पदावर राष्ट्रवादीने बसवले. अशा पक्षाला जातीयवादी म्हणणाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असे प्रत्त्युत्तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरेंना दिले आहे.
मुंबई : राष्ट्रवादी (NCP) असा पक्ष आहे, ज्यांनी सर्व जाती-धर्मांना (Caste-Religion) स्थान दिले आहे. या पक्षाचे नेतृत्व ओबीसी नेते छगन भुजबळ, आदिवासी समाजातून आलेल्या मधुकर पिचड तसेच बीडमधील धनंजय मुंडे यांनी केले. पहिल्यांदा छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले. अशा विविध जातीच्या नेत्यांना जबाबदारीच्या पदावर राष्ट्रवादीने बसवले. अशा पक्षाला जातीयवादी म्हणणाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असे प्रत्त्युत्तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरेंना दिले आहे. राष्ट्रवादीची स्थापना 1999ला झाली. त्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला. राष्ट्रवादीच्या विविध संघटना जातीयता वाढवत असल्याचे राज ठाकरे काल म्हणाले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर टीका केली होती. त्याला शरद पवार यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे काल म्हणाले होते, की मी जे पवार साहेबांबाबत बोललो, की जातीयवाद जो आला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून. महाराष्ट्रात जात होतीच, हजारो वर्षांपासून जात आहे. पण प्रत्येक जातीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 1999ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकावली गेली. इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे… राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड, सी ग्रेड अशा कुठल्या संघटना काढल्या आहेत. त्या 1999नंतरच कशा आल्या? हा योगायोग नाही, यांनीच काढल्या, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पवारांवर निशाणा साधला होता.