एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषाला हात दाखवला; शरद पवार म्हणाले, आत्मविश्वास नसला की…
आसाममध्ये काय घडलं ते सर्व देशांनी पाहिलं. आता पुन्हा आसामची ट्रिप होणार आहे. वर्तमानपत्रातच आम्ही या बातम्या वाचतो. कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणं.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर येथील एका मंदिरात जाऊन ज्योतिषाला आपला हात दाखवला. सरकार किती काळ टिकेल याची माहिती त्यांनी घेतल्याचं वृत्त आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याची बातमी पसरल्याने त्यावरून मुख्यमंत्र्यांवर प्रचंड टीका होत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे. आत्मविश्वास नसला की ज्योतिष पाहावं लागतं, असा चिमटा शरद पवार यांनी शिंदे यांना काढला आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. दोन महिन्यात राज्य सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? असं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी शिंदे यांना चिमटे काढले.
मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे सरकार कधी कोसळेल हे मी सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वास नाही. मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. हल्ली आपण नवीन गोष्टी पाहात आहोत, महाराष्ट्रात जे कधी घडलं नव्हतं. ते घडत आहे. ठिक आहे, असं पवार म्हणाले.
आसाममध्ये काय घडलं ते सर्व देशांनी पाहिलं. आता पुन्हा आसामची ट्रिप होणार आहे. वर्तमानपत्रातच आम्ही या बातम्या वाचतो. कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणं. त्यानंतर दुसरीकडे जाऊन हात दाखवणं या गोष्टी महाराष्ट्राला नवीन आहे. हे राज्य पुरोगामी आहे. विज्ञानाचा पुरस्कार करणारं राज्य म्हणून लौकीक आहे. त्या राज्यात या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात. ज्योतिषाला हात दाखवतात, असा चिमटा त्यांनी काढला.
मध्यावधीचं भाष्य मी कधीच केलं नाही. इथे कुणी केलं असेल, ते मला माहीत नाही. पण मी कधी भाष्य केलं नाही. मध्यावधी होईल की नाही हे सांगण्याच्या मी स्थितीत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.