Sharad Pawar: बंडामागे भाजपच ! अवघ्या काही मिनिटांच्या अंतरात राष्ट्रवादीच्या दोन भूमिका, शरद पवार म्हणतात, अजित पवारांना माहिती कमी
काही वेळातच शरद पवार यांनी या बंडामागे भाजपच आहे. असे म्हणत अजित पवार आणि जयंत पाटलांची भूमिका फेटाळून लावलेली. तसेच अजित पवारांना कमी माहिती असल्याचेही पवार म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या या वेगवेगळ्या भूमिकांचीही चांगलीच चर्चा होत आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामागे नेमकं कोण? या सवालामागे राज्याचे राजकारण सध्या फिरताना दिसून येत आहे. याच प्रश्नावर काही मिनिटाच्या अंतरावर राष्ट्रवादीच्या दोन भूमिका दिसून आल्या. सुरूवातील जयंत पाटील यांनी यामागे भाजपचा हात आहे, असे वाटत नाही, मी अद्याप यावर बोलणार नाही, असे म्हणत बंडामागे भाजप असल्याचे नाकारले. त्यानंतर अजित पवार यांनीही (Ajit Pawar) जयंत पाटलांच्या सुरात सुर मिसळत या बंडामागे भाजप (Ajit Pawar) नाही म्हणत भाजप नेत्यांना क्लिनचिट दिली. मात्र काही वेळातच शरद पवार यांनी या बंडामागे भाजपच आहे. असे म्हणत अजित पवार आणि जयंत पाटलांची भूमिका फेटाळून लावलेली. तसेच अजित पवारांना कमी माहिती असल्याचेही पवार म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या या वेगवेगळ्या भूमिकांचीही चांगलीच चर्चा होत आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून हे पाहून विधान केलं आहे. इथं प्रत्यक्ष लोक हलवणं आणि हे ऑपरेशन करणं यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसते. अजित पवारांना स्थानिक माहिती जरूर आहे. परंतु गुजरात आणि आसामची स्थिती आम्हाला अधिक माहीत आहे. राज्याच्या बाहेर आहे. मी एक उदाहरण सांगतो. शिंदेंचं एका मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं म्हटलंय. माझ्याकडे देशातील सर्व पक्षाची यादी आहे. त्यात देशात राष्ट्रीय पक्ष कोण भाजप, मायावती, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, काँग्रेस, राष्ट्रवादी ही अधिकृत यादी आहे. आता तुम्हीच सांगा सीपीआय सीपीएम काँग्रेस राष्ट्रवादीचा यात हात आहे का? मग जे नाहीत त्याचा तुम्ही विचार केला तर आहेत कोण हे सांगावं लागत नाही, असे म्हणत त्यांनी थेट भाजपकडे बोट दाखवलं.
गुरातमधील लोक माझ्या परिचयाचे
तसेच दुसरी गोष्ट म्हणजे सुरत आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक दिसली. ती अजित पवारांच्या परिचयाची आहेत असं वाटत नाही. पण माझ्या परिचयाची आहेत. उदा. सुरतला भाजपचे राज्य अध्यक्ष पाटील मराठी गृहस्थ आहेत. ते पार्लमेंटरी मेंबर आहे. त्यांचा सहभाग असेल तर अर्थ काय सांगायचा. आसाममध्ये राज्य सरकार व्यवस्था करण्यात अॅक्टिव्ह आहे. तिथलं राज्य भाजपच्या हातात आहे. त्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट होते. कोण आहे नाही हे सांगायची गरज नाही. नाव घेण्याची गरज नाही, असे म्हणत थेट नावंही सांगितली.
आमदारांना इथे यावेच लागेल
तर या आमदारांना इथे यावंच लागेल राज्यपालांपुढे यावं लागेल. किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर आसाम किंवा गुजरातचे नेते त्यांना मार्गदर्शन करतील असं वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळे आता बाजप उघडपणे याबाबत काही बोलणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच जयंत पाटील आणि अजित पवार यांनी यामागे भाजपचा हात नाही, असे का म्हटलं याचेही उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे.