शरद पवार यांनी पाकिस्तानातला ‘तो’ किस्सा सांगितला, देशातील ‘या’ राजकारण्यांवर साधला इशारा
धर्मावरुन राज्य आणि देशात जे राजकारण केलं जातं त्यामुळे आपल्याला खूप दु:ख होतं, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशातील सर्व राजकीय नेत्यांना धर्मावरुन राजकारण न करण्याचं आवाहन केलं. धर्मावरुन राज्य आणि देशात जे राजकारण केलं जातं त्यामुळे आपल्याला खूप दु:ख होतं, असं शरद पवार म्हणाले. मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानात (Pakistan) त्यांना आलेल्या अनुभवाचा किस्सा सांगितला. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आपण टीम इंडियासोबत पाकिस्तानला गेलो होतो. त्यावेळी तिथल्या नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद हा चांगला होता. सगळे सौजन्याने वागायचे, असं शरद पवार म्हणाले. “मला दुःख होतं. आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माचे, भाषाचे लोक आहेत. सर्वांमध्ये चांगले संबंध असले पाहिजेत. एकात्मता आणि प्रेम असलं पाहिजे. पण धर्म नावावर राजकारण करणारे लोक समजात द्वेष पसरवत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“मी एकदा एक गोष्ट बोललो तर मीडियाने माझ्यावर टीका केली. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होती. खरंतर तेव्हा भारत सरकारची पाकिस्तानास क्रिकेट टीमला पाठवण्याची परवानगी नव्हती. तेव्हा मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना तरुणांना खेळायला संधी द्या, अशी विनंती केली. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी परवानगी दिली”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
“त्यावेळी खेळाडू मला बोलले आम्हाला कराची बघायचं आहे. आम्ही कराचीमध्ये नाश्ता करायला थांबलो. काऊंटर पैसे द्यायला पोहोचलो तेव्हा हॉटेल मालक बोलले पैसे घेणार नाही. ते म्हणाले तुम्ही आमचे पाहुणे आहात”, असं शरद पवार म्हणाले.
“ते म्हणाले टीव्हीवर पाहिलं खेळाडू कराचीमध्ये आले आहेत. आम्ही पाहुण्यांकडून पैसे घेत नाहीत. त्यांनी पैसे घेतले नाहीत”, असा किस्सा शरद पवारांनी सांगितला.
‘ती लोकंसुद्धा भारतात येण्यासाठी तडफडत होते’
“ही गोष्ट सांगतो. माझा अनुभव आहे. किक्रेटच्या निमित्ताने परदेशात जायचो. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेत जायचो. पाकिस्तान आणि बांगलादेशची लोकंदेखील भारतात येण्यासाठी तडफडत होते. त्यांचे कोणी नातेवाईक भारतात होते. त्यांना भेटायला भारतात यायचं होतं”, असा दावा शरद पवार यांनी केला.
“सामान्य लोकांमध्ये द्वेष नाही. राजकारणी जे लोक आहेत त्यांच्यात द्वेष आहे, नागरिकांमध्ये नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“आपल्यालापण याच रस्त्यावरून गेले पाहिजे. जगातील सगळे धर्म, सर्व भाषिक लोक एकत्र आणले पाहिजेत. एकता ठेवली पाहिजे”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.