मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांना मदतीसाठी पहिल्याच दिवशी जायची इच्छा असल्याचं सांगितलंय. मात्र, राज ठाकरे यांनी आधी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचू देण्याबाबत सांगितल्यानं उशिरा भेट दिल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी मनसेचे कार्यकर्ते पूरग्रस्तांना मदतीचं काम करत असल्याचंही सांगितलं.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “महापुरात बँकेच्या कागदपत्रांपासून सगळ्या गोष्टी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून पाठवत आहोत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आवाहन केलं आणि मनसेचे अनेक ट्रक मदत घेऊन जात आहेत. मदत सर्वांपर्यंत पोचली पाहिजे. यासाठी मनसेचे कार्यकर्ते काम करत आहेत. तिथल्या पोलिसांचेही फोन आले की मनसेची मदत आली.”
“गाव दत्तक घ्यायचं असेल तर त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. नदीची खोली वाढवली पाहिजे. त्यामुळे पुराचा धोका कमी होऊ शकतो. धरणातील पाणी सोडताना त्यांनी गावकऱ्यांना आधी सांगायला हवं. मला पहिल्या दिवशी जायची इच्छा होती पण राज ठाकरे यांनी आधी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोचू द्या असं सांगितलं,” असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.
आपल्या जाण्यामुळे तिकडच्या मदत कार्यात अडचणी निर्माण होऊ शकते म्हणून राज ठाकरेंनी आणि आम्ही कुटुंबियाने जाणं टाळलं. पण मदत मात्र मनसेची सुरू आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार म्हणाले, “कोकणातील पूरग्रस्त खांदाटपाली, इंदापूर, कळकवणे, तिवरे या गावांमध्ये तातडीची मदत करत आहोत. येथे 500 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप देत आहोत.”