शीतल म्हात्रे यांनी आव्हाड यांचं जुनं प्रकरणच बाहेर काढलं?; म्हणाल्या, आता महिला म्हणून माझा झालेला अपमान…
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. माझ्यावर टीका करताना तुम्हाला तुमच्या घरची स्त्री आठवली नाही का? तुमची पत्नी आणि मुलगी आठवली नाही का? असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. म्हात्रे यांच्यावर टीका करताना तर आव्हाड यांची जीभ घसरली. त्यामुळे शीतल म्हात्रे संतप्त झाल्या आहेत. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना मुंब्र्यातील एका जुन्या प्रकरणावरूनच घेरले आहे. तसेच आता महिला म्हणून माझा झालेला अपमान चालतो का? असा सवालच शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्या मीडियाशी संवादसाधत होत्या.
मालेगावच्या संदर्भात मी केलेली टीका जितेद्र आव्हांडाना का झोंबली ते कळाले नाही. आव्हाड आता राष्ट्रवादी सोबत ठाकरे गटाचेही प्रवक्ते झाले का? त्यांच्या पक्षातही सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर आहेत. त्यांना माझ्यावर अशी टीका केलेली पटते का? ते त्यांनी सांगावे. आव्हाड यांचं राजकारणातील महत्त्व कमी झालं आहे. गेलेलं महत्त्व मिळवण्यासाठी ते असे ट्विट करत आहेत. पण त्यांच्या पक्षातील महिला नेत्यांना काय वाटते हेच मला पाहायचे आहे, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
खरे रुप समोर आले
यावेळी त्यांनी मुंब्र्यातील जुन्या प्रकरणाचा संदर्भ देत आव्हाड यांच्यावर टीका केली. आव्हाडांना आता जास्त प्रत्युत्तर देण्याची इच्छा नाही. त्यांचे खरे रुप समोर आले आहे. त्यांच्यावर जेव्हा महिलाच्या विनयभंगाप्रकरणी आरोप झाले तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगी आमच्यावर अन्याय झाला म्हणायच्या. आता त्यांना महिला म्हणून माझा झालेला आपमान चालतो का? असा सवाल म्हात्रे यांनी केला.
तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?
पहिली टीका मालेगावच्या सभेबाबत होती. त्याच्या मिरच्या आव्हाडांना का झोंबल्या ते कळलं नाही. कारण पहिलं उत्तर त्यांनी दिलं. राष्ट्रवादीचं काम करता करता त्यांनी ठाकरे गटाचे प्रवक्तेपद घेतलं की काय असं वाटायला लागलं. त्यांना या संदर्भात बोलण्याची गरज नव्हती. पण त्यांनी नसता खटाटोप केला, अशी टीका त्यांनी म्हटलं.
तेव्हा घरची स्त्री आठवली नाही का?
जेव्हा मुद्दे संपतात आणि बोलण्यासारखं काही राहत नाही. तेव्हा महिलांच्या चारित्र्यावर बोलणं फार सोपं असतं. तेच सातत्याने होत आहे. जेव्हा तुमच्यावर अन्याय झाला ते आम्ही पाहत होतो. आमच्यावर बोलताना तुम्हाला तुमच्या घरची स्त्री आठवली नाही का? तुमची पत्नी आणि मुलगी आठवली नाही का? अशा प्रकारे बोलणं अपेक्षित नव्हतं. पण उगीचच खाजवून खरून काढण्याचं काम त्यांनी केलं. मिळत नसलेलं महत्त्व परत मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.