दोन महिल्या नेत्यांवर षडयंत्राचा आरोप करत ठाकरे गटाला शिल्पा बोडखे यांचा जय महाराष्ट्र…
लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक तोंडावर असताना शिल्पा बोडखे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. इतकंच नाहीतर त्यांनी पक्षातील दोन महिला नेत्यांवर षडयंत्र केल्याचे आरोप केले आहेत.
निवृत्ती बाबर, मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सर्व पक्ष ताकदीने तयारीला लागले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत भाजप आणि शिंदे गटावर टीकांचा भडीमार करताना दिसत आहेत. लोकसभेच्या जागा ठरवत प्रचाराला लागलेल्या उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली याचं दु:ख आहे. माझा पक्षात टिशू पेपर म्हणून वापर केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या नेत्या शिल्पा बोडखे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. इतकंच नाहीतर त्यांनी पक्षातील दोन महिला नेत्यांची नावं घेत त्यांच्या मनमानी कारभारामुळे आपण पक्षाला रामाराम ठोकत असल्याचं म्हटलं आहे.
मी शिवसेना पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसुन विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटना विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला, मला वाटले, शिवसेना पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे. पण आता मला कळले येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असुन त्या उद्धव ठाकरेंच्या शब्दाला देखील हया जुमानत नाही. मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिक पणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत रंजना नेवाळकर शिवसेना भवनात बसुन षडयंत्र रचत राहिल्याचा आरोप शिल्पा बोडखे यांनी केला आहे.
माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…
माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत… pic.twitter.com/OZJUyFbKwa
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) February 22, 2024
मला सोशल मिडीया या पदावर काम करायचे नाही म्हणुन मी शिवसेना नेते आदित्य ठाकरे जी यांना पत्र देखील पाठवले. परंतु विशाखा राऊत यांना मी काम करू नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे. जर यांना संघटन वाढवण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत आहे. तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता पदाचा राजीनामा देत असल्याचं शिल्पा बोडखे यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.