मंत्रिमंडळाचा होणार विस्तार; मंत्रिपदाच्या स्पर्धेत बाजी कोण मारणार…
भरत गोगावले यांना फक्त मंत्रिपदच नाही, तर रायगडच्या पालकमंत्रिपदाचाही शब्द देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पण शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरुन संभम्र मात्र कायम आहे.
मुंबईः शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता 6 महिन्यानंतर उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मात्र यावेळी अंशत: विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधून आता कोण कोण स्पर्धेत असणार आहेत त्याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 15 ते 20 दिवसांच्या आत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात विस्ताराची शक्यता होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा विस्तार अंशत: असणार असून 22 पैकी 10 मंत्र्यांचाच शपथविधी होईल असंही सांगितले जात आहे. 10 मंत्र्यांमध्ये 2 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्रिपदाचा समावेश असणार आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात अधिक स्पर्धा ही शिंदे गटामध्येच होणार आहे. कारण शिंदे गटातील एकूण 50 आमदारांपैकी 9 जणांचाच मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळं 41 जण मंत्रिदाच्या स्पर्धेत आहेत. म्हणजेच सर्वांनाच मंत्रिपद देवून त्यांचं समाधान करणं हेही मोठं आव्हान शिंदेंसमोर असल्याचे दिसून येत आहे.
संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे, बच्चू कडू हे नेते सध्या शिंदे गटाकडून स्पर्धेत आहेत,
तर भरत गोगावले यांना फक्त मंत्रिपदच नाही, तर रायगडच्या पालकमंत्रिपदाचाही शब्द देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पण शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरुन संभम्र मात्र कायम आहे.
याआधी अनेकदा त्यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. तर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातूनच तिघांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं आहे. शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार तर भाजपकडून अतुल सावे यांना मंत्री करण्यात आले आहे.
आता संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिलं, तर एकाच जिल्ह्याला 4-4 मंत्रिपदं होणार आहेत. त्यातच विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदही अंबादास दानवे यांच्या रुपानं औरंगाबाद जिल्ह्यातच आहे.
हे सगळं झालं शिंदे गटाचं, तर भाजपकडूनही कोणाला कोणाला संधी मिळते याकडेही नजरा लागून राहिल्या आहेत. संजय कुटे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे ही मंडळीही भाजपकडून स्पर्धेत आहेत.
तर शिंदे-फडणवीस सरकारला 6 महिने झाले आहेत. सध्या 20 जणच महाराष्ट्राचा कारभार सांभाळत आहेत.
नियमानुसार, विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के मंत्री करता येतात. म्हणजे 288 आमदारांपैकी 43 मंत्री करता येतात तर सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 20 मंत्री आहेत म्हणजेच आणखी 23 मंत्रिपदं रिकामी असल्याचे स्पष्टपणे दिस येत आहे.
तर या रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुनच अजित पवार वारंवार चिमटेही काढत आहेत. शिंदेंगटासह भाजपमध्येही इच्छुक नेते अधिक आहेत, पण मंत्रिपदं थोडकीच आहेत. त्यातही अंशत: अर्थात 10 मंत्र्यांचा शपथविधी घेण्याचं ठरलं तर कॉम्पिटिशन अधिक तीव्र असणार असल्याचे दिसून येत आहे.