Eknath Shinde : तब्बल 11 दिवसांनंतर शिंदे गटातल्या आमदारांचं मुंबईत आगमन; कडेकोट बंदोबस्तात हॉटेल प्रेसिडेंटमध्ये मुक्काम
विमानतळावर स्वत: शिंदे या आमदारांसोबत होते. बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर भाजपाच्या वरच्या फळीतील नेत्यांसोबत त्यांची बैठक असणार आहे. तर विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून त्याला हे सर्व आमदार हजर राहणार आहेत.
मुंबई : शिंदे गटातील आमदारांचे मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आगमन झाले आहे. या आमदारांना मुंबई विमानतळावर घेण्यासाठी बस दाखल झाली. भारत बेंझ कंपनीची गाडी लावण्यात आली होती. 45 प्रवाशांची आसन क्षमता असणारी ही गाडी दोन तासांपूर्वीच विमानतळावर दाखल झाली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना हॉटेल प्रेसीडेंटमध्ये (Hotel President) आणले जाणार आहे. दरम्यान, हॉटेल बाहेर आणि परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आमदार येणार त्या रस्त्यानेदेखील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सीआयएसएफचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हे बंडखोर आमदार ज्या मार्गाने जात आहेत, त्या मार्गावर विशेष कॉरिडॉर (Special corridor) तयार करण्यात आला. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हा विशेष कॉरिडॉर करण्यात आला. इथे झिरो पार्किंग करण्यात आली. कोणालाही या रस्त्यावर परवानगी देण्यात आली नाही.
शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू नाही
शिवसेनेने जो व्हीप जारी केला आहे, तो आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. विमानतळावर स्वत: शिंदे या आमदारांसोबत होते. बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर भाजपाच्या वरच्या फळीतील नेत्यांसोबत त्यांची बैठक असणार आहे. तर विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून त्याला हे सर्व आमदार हजर राहणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान, शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
170हून अधिक पोलीस तैनात
ज्या ठिकाणी या बंडखोर आमदारांचा मुक्काम असणार आहे, त्या हॉटेल प्रेसिडेंटच्या परिसरात तब्बल 170हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. परिसरात कोणालाही सोडले जात नाही. सर्व्हिस रोडदेखील बंद करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेच्या वाहनांनात रस्त्याने परवानगी देण्यात येत आहे.