मुंबई : “जलयुक्त शिवाराची स्वतंत्र चौकशी एसआयटी, लाचलुचपत विभागाकडून सुरु आहे. चौकशी सुरु असताना अचानक निर्दोष, क्लिन चीटचं कमळ कसं उगवलं?”, असा खोचक सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. जलयुक्त शिवारबाबतची क्लिन चीट याबाबतची चर्चा म्हणजे कोणीतरी हे कारस्थान करतंय, असं राऊत म्हणाले.
“आमच्यावर दोषी म्हणून चिखल उडवायचा आणि स्वत:वर आलं तर निर्दोष. हा पोरखेळ बंद व्हायला पाहिजे. या महाराष्ट्रात जो पोरखेळ सुरुय तो बंद व्हायला पाहिजे. जलयुक्त शिवाराचे आरोप शेकडो कोटींचा आहे. हे आरोप बघितल्यानंतर मला बिहारमधल्या चारा घोटाळ्याची आठवण झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यात चारा घोटाळा झाल्याचं सीबीआयने म्हटलं. तसंच महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराबाबत अनेक जिल्हे आणि तालुक्यात डबके तयार झाली. त्यातून किती पाणी जिरलं आणि कोणी जिरवलं याचा तपास सुरु आहे”, असा टोला राऊतांनी लगावला. तसेच आमच्या बत्तीशीला कोणी चॅलेंश देऊ नका. आमचे दात मजबूत आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ‘पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असं ट्विट केलंय. तसेच मलिकांनी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपांबाबत राऊतांनी टीप्पणी केली होती. त्यांच्या त्या वक्तव्यावर आज पुन्हा पत्रकारांनी विचारलं. त्यावर त्यांनी “आतापर्यंतची स्क्रिप्ट लिहिलीय ती ‘शोले’ आणि ‘दिवार’पेक्षा कमी नाही. शोले, दिवार, जंजीर हे सलीम-जावेदचे अत्यंच गाजलेल्या स्क्रिप्ट आहेत ही त्याच तोडीची स्क्रिप्ट आहे. त्याच पद्धतीने नवाब भाईंनी जे सांगितलंय त्यावर विचार करु”, असं मिश्किल उत्तर दिलं.
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यावर शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर राऊतांनी कुणावरही अन्याय होणार नाही, असं उत्तर दिलं. तसेच या विषयावर आपलं मुख्यमंत्र्यांशी बोलणं देखील झाल्याचं राऊत म्हणाले. पण त्याबाबत माध्यमांसमोर बोलणं योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.
“या महाराष्ट्रात कुणावरही अन्याय होत नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे शिवरायांच्या विचारावर चालणारं सरकार आहे. जनता सामान्य असो किंवा अन्य असो, विशेष करुन महिला अन्याय होणार नाही, ही बाळासाहेबांची शिकवण आहे. शरद पवार तर आहेतच. त्याचंही मार्गदर्शन आहे. क्रांती रेडकर इतर नेत्यांनाही भेटल्या असतील. माझं सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं. मुख्यमंत्र्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. मराठी, महिलांसंदर्भात कोणावरही अन्याय होणार नाही. न्याय आणि सत्य या दोन पायांवर हे सरकार उभं आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही देशाला आदर्श असलेली चळवळ आहे. हे पुरोगामी राज्य आहे. संकट काळात विशेषत: गेल्या दोन वर्षात जे लॉकडाऊन कोरोना असेल संपूर्ण जग ठप्प झालं असेल महाराष्ट्राचा मुख्य आर्थिक कणा सहकार क्षेत्रावरच टिकून राहिला. ग्रामीण अर्थकारण सहकार क्षेत्रावरच चालत असतं. फक्त एखाद्या संस्था आणि संघटना आमच्या पक्षाच्या ताब्यात नाहीत म्हणून त्या मोडणं याला सहाकर म्हणत नाही. याला सूड सहकार म्हणतात”, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
हेही वाचा : VIDEO: ‘बॉलिवूड’ला बदनाम करून ‘यूपीवूड’ कधीच तयार होणार नाही; नवाब मलिकांनी योगी आदित्यनाथांना सुनावले