एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढवण्यासाठी ठाकरे गटाची नवी खेळी, राज्यातील सत्तासंघर्षाबद्दल सर्वात मोठी बातमी
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला घेरण्यासाठी आता ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. विशेष म्हणजे सत्तासंघर्षाची सुनावणीवर लवकर न्यायनिवाडा करण्याचे संकेत स्वत: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आपली पूर्ण बाजू मांडल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय शिंदे गटाच्या वकिलांना दोन दिवसांची मुदत कोर्टाकडून देण्यात आली आहे. येत्या 14 मार्चला या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद मांडण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. असं असताना ठाकरे गटातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
शिवसेनेचा ठाकरे गट येत्या दोन दिवसांत सुप्रीम कोर्टात जोडपत्र सादर करणार आहे. युक्तिवादातील राहिलेले मुद्दे या जोडपत्राताच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. विश्वसनीय सूत्रांनी याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. या जोडपत्रातून आपले राहिलेले मुद्दे ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचवणार आहे. संबंधित मुद्दे हे कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढवणारे देखील असू शकतात. पण ते मुद्दे नेमके कोणते असतील याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केलेला. एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी नियमांच्या कक्षा ओलांडून त्यांना मदत केली, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आलेला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाने नेमलेले पक्ष प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीदेखील बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी हा युक्तिवाद केला. तर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला.