मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. भाजप आणि शिंदे गट यांच्यांवर सतत टीका आणि आरोप ते करतात. रोज सकाळी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. शुक्रवारी पुन्हा त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. त्याचवेळी महाविकास आघाडी एकत्र असल्याचा दावा केला. आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार लोकसभेत दिसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. यामुळे राज्यात ठाकरे गटाने जिंकलेल्या सर्व १८ जागा ते लढवणार असून इतर काही जागांवरही दावा करणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले.
काय म्हणाले संजय राऊत
महाविकास आघाडीत निवडणुकीचा कोणताही फार्मूला अजून ठरलेला नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडी आहे आणि राहील. लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. तसेच २०१९ मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल अन् पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील १८ आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व १९ जण निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
सरकारचा पोपट मेला
बेकायदेशीर सरकारचा पोपट मेला आहे. या सरकारला बेकायदेशीरपणे ऑक्सिजन दिले जात आहे. परंतु या सरकारचा निर्णय लागणार आहे. हा निर्णय देताना अध्यक्षांनी योग्य निर्णय द्यावा. कारण घटनात्मक पदावर बसलेले व्यक्ती राजकीय असतो, हा धोका आहे. बीएमसी निवडणूका घ्या..मग कळेल..जनता दाखवणार कोणाचा पोपट मेला आहे, असे राऊत यांनी म्हटले.
राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न
राज्यात दंगली घडवणाऱ्या टोळ्या निर्माण केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वरची घटना खोटी आहे, असे काहीच घडले नाही. त्र्यंबकेश्वरमधील ग्रामस्थांनी दंगली घडवण्याचा प्लॅन उधळून लावला. याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. परंतु मुळ प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी हे प्रयत्न होत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
जाधव यांची हकालपट्टी
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. अंधारे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सध्या बीडमध्ये आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, घडलेला प्रकार दुर्देवी आहे. या प्रकरणाची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्वरित घेतली. त्यांनी जाधव यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे.