Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : महाराजांचा आणि बाळासाहेबांचा फोटो न काढताच तोडकाम झाल्याचा आरोप, पाहा Video
शिवसेनेच्या अनधिकृत शाखेचं तोडकाम...शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न काढताच झालेल्या तोडकामाचा आरोप यावरुन वाद पेटलाय. त्यात शिंदे गटाच्या नेत्यांनी एक व्हिडीओ जारी केलाय.
मुंबई : शिवसेनेच्या अनधिकृत शाखेच्या पाडकामावेळी झालेल्या राड्यात 14 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र पाडकामवेळचे दोन व्हिडीओ समोर आल्यानं त्यावरुन दोन दावेही केले जातायत. पाडकामाआधीच शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमा काढून घेण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केल्याचा दावा होतोय.
शिवसेनेच्या अनधिकृत शाखेचं तोडकाम…शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न काढताच झालेल्या तोडकामाचा आरोप यावरुन वाद पेटलाय. त्यात शिंदे गटाच्या नेत्यांनी एक व्हिडीओ जारी केलाय. ज्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना महापालिका अधिकाऱ्यांनी तोडकामाआधीच महापुरुषांचे फोटो काढून घ्या, असं सांगितल्याचा दावा आहे. दुसरीकडे फोटो हटवू न देताच पालिका अधिकाऱ्यांनी तोडकामाची घाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे.
पाहा व्हिडीओ-
दोघांपैकी कोणता व्हिडीओ खरा, शिंदे गटाचा की मग ठाकरे गटाचा? हा अजून चौकशीचा भाग आहे. मात्र शाखेतल्या आत घडलेल्या प्रकारात कुणाची चूक आहे. यावर जरी प्रश्न असले तरी शाखेबाहेरचा बोर्ड बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसहीतच तोडला गेला. त्यात तोडकाम सुरु असल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे दिसतंय.
शाखेतून शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचे फोटो काढू न देताच पाडकाम झाल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. त्याविरोधात ठाकरे गटानं पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी आमदार अनिल परबांसह 14 जणांवर गुन्हा दाखल झालाय. आणि 4 पदाधिकाऱ्यांना पोलीस कोठडीही सुनावली गेलीय. मात्र जेव्हा भाजप समर्थक आमदार गीता जैन पालिकेच्या व्यक्तीला कानशिलात मारतात. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर जेव्हा सरकारी कर्मचाऱ्याला मारतात. तेव्हा त्यांच्यावर तातडीनं कारवाई का झाली नाही, असा आरोप विरोधक करतायत.
गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलंय की कोणत्याही आमदारानं जर कायदा हाती घेतला असेल तर त्यावर कारवाई झालीय. मात्र भाजप समर्थक आमदार गीता जैन यांनी मुंबई महापालिकेच्या इंजिनिअरच्या कानशिलात मारली. त्याला 6 दिवस लोटले असूनही अद्याप गुन्हा दाखल नाही. विशेष म्हणजे मारहाण झालेल्या इंजिनीअरनी तक्रार देऊनही सखोल चौकशीअंती गुन्हा दाखल करु, असं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर इंजिनीअरनेच स्वतः तक्रार मागे घेतलीय.
शिंदे गटाचे आमदार यांनी आधी सरकारी कर्मचाऱ्याला कानशिलात मारली. त्यानंतर विमा कंपनीचं ऑफिस फोडलं. पण या दोन्ही प्रकरणात संतोष बांगरांवर आजवर गुन्हा दाखल झालेला नाही. मग ठाकरे गटाच्या तब्बल 14 जणांवर फक्त काही तासातंच तातडीनं गुन्हा दाखल का होतो, असा प्रश्न विरोधक करतायत.
आश्चर्य म्हणजे अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. जी अनधिकृत शाखा होती ती माहितीनुसार ३० वर्षांपासून तिथं आहे. दरम्यान, किती शाखा बेकायदेशीर आहेत याचा हिशेब करुन ठाकरे गटानं भाडेकरारावर शाखा घ्याव्यात असं दीपक केसरकरांनी म्हटलंय.
तूर्तास शिंदे गटाकडून जारी व्हिडीओत फोटो काढा म्हणून सांगितलं गेल्याचा दावा होतोय. तर दुसरीकडे शाखेबाहेरच्या फलकावरुन बाळासाहेबांचा फोटो न काढताच त्याचं तोडकाम झाल्याचा व्हिडीओ ठाकरे गटानं दिलाय. चौकशीअंती काय समोर येईल. ते पाहणं महत्वाचं आहे.