VIDEO: आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, संजय राऊतांनी सांगितला शिवसेनाचा पुढचा प्लान
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भविष्यातील शिवसेनेची दिशा स्पष्ट केली आहे. दिल्लीच्या दिशेने आमची पावलं पडत आहेत.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भविष्यातील शिवसेनेची दिशा स्पष्ट केली आहे. दिल्लीच्या दिशेने आमची पावलं पडत आहेत. आता या पुढे आम्ही प्रत्येक राज्यात निवडणुका लढू, अशी घोषणाच संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर आज संजय राऊत यांनी शिवसेनेचा भविष्यातील प्लानच जाहीर केला. शिवसेनेची पावलं दिल्लीच्या दिशेने पडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल हा स्पष्ट संदेश दिला आहे. आम्हाला देशभर विस्तार करायचा आहे, त्यासाठी संघर्ष करण्याची अडचणीचा सामना करण्याची आमची तयारी आहे. प्रत्येक राज्यात आम्ही निवडणुका लढवू. आज यश येणार नाही. उद्या यश येईल हा विश्वास आणि आत्मविश्वास आमच्यात आहे. गोव्यात लढतोय, उत्तर प्रदेशात पाऊल ठेवलं आहे. दादरा-नगर हवेलीत आम्ही लोकसभेची जागा जिंकली आहे. आम्ही दक्षिण गुजरातमध्ये काम सुरू केलं आहे, असं राऊत म्हणाले.
आम्ही भाजपला देशभर वाढवू दिलं
बाबरी नंतर उत्तर हिंदुस्थानात शिवसेनेची एक लहर होती. उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या असत्या तर देशात आमचा पंतप्रधान झाला असता. पण आम्ही भाजपला मोकळीक दिली. भाजपला वाढवू दिलं. आम्ही महाराष्ट्रात काम केलं. हे बाळासाहेबांचं मोठेपण होतं. ते खरे हिंदुत्ववादी होते. एक हिंदुत्ववादी पार्टी वाढत असेल तर त्यांच्यात अडथळा आणू नये अशी त्यांची भूमिका होती, असं त्यांनी सांगितलं.
तर परिणाम भोगावे लागतील
आम्हाला आमची ताकद माहीत आहे. आमचा आत्मविश्वास आम्हाला घेऊन जातो. आमचा केडरबेस पक्ष आहे. आमच्याशी टक्कर दिली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. ईडी असो, सीबीआय असो किंवा केंद्राची सत्ता असो तुम्ही कितीही आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न करा, आम्ही घाबरणार नाही. आम्ही लढायला तयार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
पुन्हा युती? संपलं सगळं
कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून भाजप- शिवसेना एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, भाजप सोबत एकत्र येण्याचा सवाल वारंवार का विचारता? काय आहे? संपलं सर्व, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
सत्ता हवी असेल तरच हिंदुत्व आठवते
यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. भाजपचं हिंदुत्व ड्युप्लिकेट आणि नकली आहे. सत्ता हवी असेल तरच त्यांना हिंदुत्व आठवते. पाकिस्तान, मुसलामान त्यांना आठवतात. काम झाल्यावर फेकून देतात. राजकीय गरज भागल्यावर ते इतरांना फेकून देतात. हा त्यांचा धर्म आहे, नीती आहे. पर्रिकर ते पार्सेकर आणि खडसेंचं काय झालं हे तुम्ही पाहिलं असेल. मुंडे कुटुंबाबत काय होत आहे हे तुम्ही पाहातच आहात. सर्व देशात हे होत आहे. पासवानांच्या कुटुंबाचं काय झालं हे तुम्ही पाहिलं असेल, असं ते म्हणाले.
वापरा आणि फेका हेच त्यांचं धोरण
उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण आपण पाहिलं असेल. त्यांना बोलताना पाहूनच विरोधकांची झोप उडाली असेल. उद्धव ठाकरेंना बोलता येत नाही, चालता येत नाही, ते कुठे काम करत आहेत? असा सवाल काल सकाळपर्यंत केला जात होता. काल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत चालत आले. त्यांनी तिथून शिवसेना, महाराष्ट्र आणि राष्ट्राला संबोधित केलं. तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. निवडणुकीतील हारजीत सेनेला खचवत नाही. 25 वर्ष युतीत कसे सडलो या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. तीव्र भावना व्यक्त केली आहे. वापरा आणि फेका असं भाजपचं हिंदुत्व आहे हे त्यांनी काल परखडपणे सांगितलं.
संबंधित बातम्या:
औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा हरिभाऊ नानांचा झेंडा, उपाध्यक्षपद निवडीकडे लक्ष!