Eknath Shinde : दहा दिवसानंतर शिंदे मुंबईत, अभिवादन करायला गेले तर शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई विमानतळावरून निघाल्यावर एकनाथ शिंदे यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. राज्य सरकारतर्फेही येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तब्बल दहा दिवसानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आल्यामुळे शिंदे समर्थकांचीही रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दहा दिवसानंतर मुंबईत दाखल झाले. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात भेटायला ते गेले. मात्र यावेळी शिवसैनिकांनी मोठी घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे यांचा विरोध शिवसैनिकांनी केला. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, एकनाथ शिंदे वीस मिनिटे सागर बंगल्यात होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि इतर भाजपा नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली. संध्याकाळी सातवाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर हे सर्व मंत्री राजभवनात नंतर दाखल झाले. तत्पूर्वी, एकनाथ शिंदे यांचे मुंबई विमानतळावर दुपारी अडीचच्या सुमारास आगमन झाले. विशेष म्हणजे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपा (BJP) नेतेही उपस्थित होते. भाजपाचे आशिष कुलकर्णी, आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंचे स्वागत केले.
मोठा पोलीस फौजफाटा
मुंबई विमानतळावरून निघाल्यावर एकनाथ शिंदे यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. राज्य सरकारतर्फेही येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तब्बल दहा दिवसानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आल्यामुळे शिंदे समर्थकांचीही रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. पोलिसांची एक मोठी फौज जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे तैनात करण्यात आली होती. शिंदे यांच्या गाडीच्या मागे पुढेही अनेक गाड्यांचा ताफा देण्यात आला.
हकालपट्टी की 11 जुलैपर्यंत वाट पाहणार?
शिवसेना म्हणून शिंदे गट विधानसभेत राहणार आहे. शिवसेनेचे एक तृतियांश आमदार फुटल्याने आता या आमदारांना पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार नाही. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदेंसह या 40 आमदारांची पक्षातून हकालपट्टी करणार, की 11 जुलैच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडताना त्या बंडखोरांना काय करायचे ते करू द्या, त्यांच्या वाटेत येऊ नका, असे आवाहन शिवसैनिकांना केले होते. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात या बंडखोरांची हकालपट्टी करण्याचा ठाकरे निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे.