मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना उमेदवारी देणार की शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना शिवसेना राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून संभाजी छत्रपती यांनी थेट घराण्याचा दाखलाही दिला होता. छत्रपती घराण्याचा मुख्यमंत्री सन्मान करतील असा विश्वास संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शिवेसनेची राजकीय कोंडी झाल्याचं सांगितलं जात होतं. शिवसेना संभाजी छत्रपती यांना पाठिंबा देईल अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, राज्यसभेच्या सहाव्या जागेचा सस्पेन्स शिवसेनेने संपवला आहे. शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी निश्चित केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तसं स्पष्ट विधान केलं आहे. संजय पवार यांच्या नावाची घोषणा होणार आहे. आमच्यासाठी राज्यसभेचा हा विषय संपला असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता संभाजी छत्रपती काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराजांना पक्षाचे वावडे नसावे. ज्याच्याकडे 42 मते असतील ते निवडून येतील. संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकर होईल. संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच आमच्यासाठी आता राज्यसभेचा चॅप्टर क्लोज झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
संजय पवार हे शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षापासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील कणखर नेतृत्व म्हणून संजय पवार यांच्याकडे पाहिले जाते. यावेळी ग्रामीण भागातील उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. संभाजी छत्रपती यांनी शह देण्यासाठीच संजय पवार यांना तिकीट दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यादृष्टीकोनातून सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजे विरुद्ध संजय पवार असा सामना याठिकाणी पाहायला मिळणार आहे.
राज्याच्या विधानसभेत सध्या शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. इतर पक्षांचे 8 आणि अपक्ष 8 मिळून महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या 169 होते. तर भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यात भाजपचे 106 आमदार, रासप, जनसुराज्य पक्षाचा प्रत्येकी 1 आणि अपक्ष 5 आमदार आहेत. संख्याबळानुसार महाविकास आघाडी आपले तिन्ही उमेदवार निवडून आणू शकते. तर उरलेली 27 मते आणि इतर अधिक अपक्षांची 16 मते मिळून चौथा खासदारही महाविकास आघाडी निवडून आणू शकते. या शिल्लक मतात शिवसेनेची मते सर्वाधिक आहेत. दुसरीकडे भाजप संख्याबळानुसार दोन जागा सहज निवडून आणू शकते. दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 22 मते शिल्लक राहतात. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर पक्ष आणि अपक्ष आमदारांची 7 मते अशी एकूण 29 मते शिल्लक राहतात. त्यामुळे भाजप तिसरा उमेदवार देण्याची खेळी करू शकते. मात्र, भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येणं कठिण आहे.