Rajya Sabha Election Result 2022 : संजय राऊतांचा गेम होता होता राहीला, फडणवीसांच्या ‘चमत्कारातून’ सहीसलामत कसे सुटले?
राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला, तर महाविकास आघाडीत शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी असे तीन उमेदवार विजयी झाले.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) अखेर भाजपाचा विजय झाला. महाविकास आघाडीचा विजयाचा दावा हवेत विरला. मात्र यात एक विजय अगदीच अटीतटीचा ठरला तो म्हणजे संजय राऊत (Sanjay Raut) यांचा शिवसेनेचे दोन उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार यांच्यामध्ये संजय पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर संजय राऊत यांचा निसटता विजय झाला. लढत अटीतटीची ठरली, मात्र भाजपाने (BJP) रडीचा डाव खेळला, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. त्यात निकालही लांबला होता. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. अखेर यात भाजपाने विजय मिळवला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठीचे मदतान काल पार पडले. त्यात शिवसेनेतर्फे संजय राऊत, संजय पवार, राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, तर भाजपाकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे उमेदवार होते.
संजय राऊतांना 41 मते!
अटीतटीच्या या लढतीत शिवसेनेच्या संजय राऊत यांचा निसटता विजय झाला आहे. त्यांना 41 मते मिळाली. भाजपाच्या पीयूष गोयल यांना सर्वच्या सर्व 48 मते मिळाली आहेत. अनिल बोंडे यांनीदेखील 48 मते मिळवली. शिवसेनेतर्फे रिंगणात असलेले संजय पवार यांना मात्र 39 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली असून त्यांचा विजय झाला आहे. भाजपाकडे अपक्षांची संख्या अधिक होती. त्यामुळे महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या आमदारांना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न केले. विविध मार्गाने माणसे आपल्या बाजूने करण्यात फडणवीसांना यश आले, असे नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
कोणाचा विजय, कोण पराभूत?
राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला, तर महाविकास आघाडीत शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी असे तीन उमेदवार विजयी झाले. भाजपा आणि सत्ताधारी युतीने क्रॉस-व्होटिंग आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्यानंतर राज्यात मतमोजणीला सुमारे 8 तासांचा विलंब झाला होता. राज्यसभेची कालची लढत ही प्रामुख्याने सहाव्या जागेसाठी होती. कारण पाच जागा आधीच निश्चित झाल्या होत्या. भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार हे या लढतीत आमनेसामने होते. या लढतीमध्ये पहिल्या फेरीत संजय पवारांना पहिल्या पसंतीची 33 तर महाडिकांना 27 मते मिळाली. मात्र महाविकास आघाडीला अपेक्षित 10 मते फुटली, त्यामुळे संजय पवारांचा दोन मतांनी पराभव झाला.