MLA Disqualification | विधानसभा अध्यक्षांसमोर नेमकं घडलं काय? जाणून घ्या आमदार अपात्रतेची अपडेट
MLA Disqualification | शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार युक्तीवाद रंगला. आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत दोन्ही बाजूंनी आग्रही भूमिका मांडण्यात आली. प्रकरणात पुढील सुनावणी 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जाणून घ्या आजच्या सुनावणीत काय काय घडलं ते?
मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी एक दिवसापूर्वीच गुरुवारी झाली. G-20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपस्थित राहतील. त्यामुळे अध्यक्षांनी शुक्रवारी होणारी सुनावणी एक दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आजच्या बैठकीत तीन अर्जावर जोरदार युक्तीवाद झाला. आज अडीच तासांहून अधिक काळ सुनावणी झाली. अध्यक्षांसमोर दोन्ही पक्षांनी त्यांची आग्रही भूमिका मांडली. प्रकरणात आता पुढील सुनावणी 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यात या तीन अर्जांवर निकाल येण्याची शक्यता आहे.
सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी नको
सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी नको, असा युक्तीवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केला. प्रत्येक याचिकेची कारणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याचा मुद्दा लावून धरण्यात आला. त्यांचे वकील या भूमिकेवर ठाम राहिले. शिंदे गटाकडून केवळ त्यांचे वकील उपस्थित होते. ठाकरे गटाचा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलाने अनेकदा खोडून काढला.
सर्व याचिकावर एकत्र सुनावणी घ्या
तर ठाकरे गटाने सर्व याचिका एकत्र करण्याची भूमिका मांडली. त्यावर याचिकेतील मुद्दे वेगळे असताना सर्व याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल, असे मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडले. आजच्या सुनावणीला ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि वकील उपस्थित होते.
हा तर वेळकाढूपणा
यापूर्वीच्या याचिकांवर सुनावणी झाली तर प्रकरणावर लवकर निकाल येईल, असे शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी सांगितले. ठाकरे गटाच्या तीन अर्जामुळे विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिंदे गटाचा वेळकाढूपणा सुरु असल्याची टीका खासदार अनिल देसाई यांनी केली. राहुल नार्वेकर जी-20 बैठकीसाठी दिल्लीत जात आहेत. या याचिकेतील तीन अर्जावर 20 ऑक्टोबर रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. तर याचिकेवरील निकाल येण्यास अजून वेळ लागेल. या याचिकेवर युक्तीवाद रंगणार आहे. आमदार अपात्रतेच्या याचिकांवर 23 नोव्हेंबरपर्यंत युक्तीवाद होणार आहे.