अस्माला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, आमदार प्रताप सरनाईक यांचं आश्वासन
कठीण परिस्थितीवर मात करत अस्माने दहावीमध्ये यश संपादन केले असून तिच्या मदतीला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे धावले आहेत.
मुंबई : मुंबईतील फूटपाथवर राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या अस्मा शेखच्या (Shivsena MLA Pratap Sarnaik) यशाची बातमी समजल्यानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. कठीण परिस्थितीवर मात करत अस्माने दहावीमध्ये यश संपादन केले असून तिच्या मदतीला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे धावले आहेत. तिला पुढील शैक्षणिक वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करण्यासह तिला राज्य सरकारकडून हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले (Shivsena MLA Pratap Sarnaik).
बुधवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. 95 ते 100 टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थीही पहायला मिळाले. पण, मुंबईच्या फूटपाथवर राहून आणि कठीण परिस्थितीत संघर्ष करुन परीक्षेत 40 टक्के गूण मिळवणाऱ्या अस्मा शेखचे यश अधिक लक्षवेधी आहे. तिचे सगळीकडे कौतुक होत आहे. आज तिचे अभिनंदन करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी तिला फोन करुन तिचे विशेष कौतुक केले.
तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी प्रताप सरनाईक यांनी दाखवली. पण त्याआधीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचे अस्माने सांगितले. अस्मा शेखला आवश्यक ते पुढील सर्व सहकार्य करु, असे सरनाईक यांनी सांगितले आहे. आम्हाला हक्काचे घर मिळावे, अशी अपेक्षा तिने आमदार सरनाईक यांच्याकडे बोलताना व्यक्त केली.
अस्मा शेखला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु : प्रताप सरनाईक
आपण राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री तसेच गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन MMRDA किंवा म्हाडाकडून अस्मा शेखला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे सरनाईक म्हणाले. तसेच, कॉलेज करुन पार्टटाइम जॉब करायचा असेल तर मुंबईत फोर्ट भागात नोकरी मिळवून देण्याचा शब्द सरनाईक यांनी दिला. त्यावर अस्मा शेखनेही कॉलेज करून पार्ट टाइम नोकरी करण्याची तयारी दर्शवली आहे (Shivsena MLA Pratap Sarnaik).
रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या अनेक नागरिकांना MMRDA च्या योजनेत घरे देण्यात आली आहेत. त्याचपद्धतीने कठीण परिस्थितीत संघर्ष करुन यश मिळविणाऱ्या आणि सर्वांपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या अस्मा शेखला राज्य सरकारकडून घर मिळवून देण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
अस्मा शेखची लढाई
आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोर फूटपाथ हेच तिचे घर. ना काही आडोसा ना डोक्यावर छप्पर. फुटपाथवर अंथरलेला प्लास्टिकचा कागद आणि त्यावरच वर्षानुवर्षे सुरु असलेली आयुष्याची लढाई. स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात अभ्यास. रस्त्यावर स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात तिने अभ्यास केला आणि यश मिळवले.
तिने संघर्ष केला पण शिक्षण घेण्याची जिद्द मनात कायम ठेवली. तिचा हा संघर्ष इतर सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. काबाडकष्ट करुन आजच्या सर्वसामान्य तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावा असा संघर्ष तिने केला. स्वतः शिकत आहे आणि तिने इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
अस्मा शेखच्या या संघर्षातून सर्व सुखसोयी असतानाही कूरकूर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी धडा घेण्याची गरज आहे. रस्त्यावर राहणाऱ्या आसमाचे 40 टक्क्यांचे हे यश निश्चितच 90 टक्क्यांहून कमी नाही. तिला मार्क्स किती मिळालेत हे महत्वाचे नाही, पण या परिस्थितीतही शिक्षण घेण्याची जिद्द तिने मनात कायम ठेवली, प्रयत्न केले हे महत्वाचे असून तिला पुढील वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करु, असे सरनाईक म्हणाले.
रस्त्यावर लिंबू सरबत विकणाऱ्या आपल्या वडिलांना फुटपाथवरुन स्वत:च्या घरात न्यायचं तिचं स्वप्न आहे. त्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करु असा शब्द सरनाईक यांनी दिला आहे.
SSC Result 2020 | बीडच्या पठ्ठ्याची कमाल, दहावीत सर्वच्या सर्व विषयात 35 गुण!https://t.co/oza4Qrg4eI#sscresult2020 #sscresult
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 29, 2020
Shivsena MLA Pratap Sarnaik
संबंधित बातम्या :
बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकातील ‘तो’ वादग्रस्त पाठ अभ्यासातून कमी, परीक्षेत प्रश्नही नसणार