मुंबई, दि. 6 फेब्रुवारी 2024 | आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणास दोन दिवस झाले असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो सोमवारी व्हायरल झाला आहे. त्यात पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या फोटोवरील चर्चा सुरु असताना अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली. सोमवारी या दोन फोटोंवरील चर्चा सुरु असताना मंगळवारी संजय राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़.
पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर शिवसेनेकडून युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कारण अनिकेत हा हेमंत दाभेकर याला घेऊन आला होता. त्यानंतर सोमवारीच अजित पवार यांची पुण्यातील गुंड असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतल्याचा फोटो समोर आला. या सर्व प्रकरणावरुन राजकीय वादळ सुरु असताना मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळ याचा फोटो आला. त्यावरुन संजय राऊत यांनी हल्ला केला आहे.
महाराष्ट्रात गुंडा राज:
गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य!
हे महाशय कोण आहेत?
त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे… pic.twitter.com/n1L3722t1c— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2024
संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने..
निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत आहे. त्याच्यावर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़त. पुण्यातील गुंड गजानन मारणे आणि घायवळ टोळी या दोन्ही टोळ्यांमध्ये २०१० मध्ये वाद झाला होता. त्यावेळी निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खून केला होता़. या खटल्यात फेब्रुवारी २०१९ मध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती़. आता संजय राऊत यांच्या नव्या आरोपानंतर शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाणार? याकडे आता लक्ष लागले आहे.
हे ही वाचा
पुण्यातील गुंडाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा, फोटो व्हायरल होताच मोठी कारवाई
आधी पार्थ पवार अन् गुंड गजा मारणे भेट, आता अट्टल गुन्हेगार असिफ दाढी अजित पवार यांना भेटला