मुंबई : जावेद अख्तर यांच्या आरएसएस-तालिबानी तुलनेवर एकीकडे भाजप आक्रमक झालेलं असताना आता शिवसेनेने देखील भाजपशी मिळतीजुळती भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच, ते आम्हाला मान्यही नाही, अशी आक्रमक भूमिका घेत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांना खडसावलं आहे.
”तालिबानचे हे कृत्य रानटी असून ते निंदनीय आहे. त्याप्रमाणे आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीची आहे, या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” असे मत ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी मांडले आहे व त्याबद्दल काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे.
सध्या आपल्या देशात कोणीही कोणाला तालिबानी म्हणत आहे. कारण अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट म्हणजे समाज व मानवजातीला सगळ्यात मोठा धोका आहे. पाकिस्तान, चीनसारख्या राष्ट्रांनी तालिबानी राजवटीचे समर्थन केले; कारण या दोन्ही देशांत मानवी हक्क, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे काहीच मूल्य राहिलेले नाही. भारताची मानसिकता तशी दिसत नाही. एकतर आपण कमालीचे सहिष्णू आहोत. लोकशाहीच्या बुरख्याआड काही लोक दडपशाही आणू पाहत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच.
जावेद अख्तर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम समाजातील अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण यावर जावेद यांनी कठोर प्रहार केले आहेत. देशात जेव्हा जेव्हा धर्मांध, राष्ट्रद्रोही विकृती उसळून आल्या त्या प्रत्येक वेळी जावेद अख्तर यांनी त्या धर्मांधांचे मुखवटे फाडले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी ‘वंदे मातरम्’चे गान केले आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वस्वी चूक आहे.
संघाची भूमिका व त्यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात आणि हे मतभेद जावेद अख्तर वारंवार मांडत असतात. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे म्हणून ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल?, असा सवालही सामनातून अख्तर यांना विचारण्यात आला आहे.
अफगाणिस्तानात निर्घृण तालिबान्यांनी जो रक्तपात, हिंसाचार घडविला आहे व मनुष्यजातीचे पतन चालविले आहे, ते काळजाचा थरकाप उडविणारे आहे. तालिबान्यांच्या भीतीने लाखो लोकांनी देश सोडला आहे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अफगाणिस्तानचा नरक बनला आहे. तालिबान्यांना तेथे फक्त धर्माचे म्हणजे शरीयतचेच राज्य आणायचे आहे. आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहणारे जे जे लोक व संघटना आहेत, त्यांची हिंदू राष्ट्रनिर्मितीची कल्पना मवाळ आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तान व हिंदुस्थान ही दोन राष्ट्रे बनल्यावर हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात सातत्याने डावलले जाऊ नये, हिंदुत्व म्हणजे एक संस्कृती असून त्यावर आक्रमण करणाऱ्यांना रोखण्याचे हक्क ते मागत आहेत.
अयोध्येत बाबरी पाडण्यात आली व तेथे राममंदिर उभे राहत आहे, पण आजही बाबरीसाठी जे हिजडेगिरी करीत आहेत त्यांचा बंदोबस्त करा व तो कायद्याने करा, असे कोणी म्हणत असतील तर ते तालिबानी कसे? कश्मीरातून 370 कलम हटविले. त्यामुळे कश्मीरचा कोंडलेला श्वास मोकळा झाला. हा श्वास पुन्हा बंद करा, अशी मागणी करणारे लोकच तालिबानी आहेत. कश्मिरी पंडितांची घरवापसी होणे गरजेचे आहे. त्यावर कोणाचेही मतभेद असता कामा नयेत. मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही.
हिंदुत्वाच्या नावाखाली कोणताही उन्माद येथे मान्य नाही. इराणमध्ये खोमेनीचे राज्य होते व आता अफगाणिस्तानात तालिबान्यांचे राज्य आले. या दोन्ही राजवटींशी हिंदुत्वाचा संबंध जोडणे हा हिंदू संस्कृतीचा अपमान ठरतो. ”मला या देशाचा खोमेनी व्हायचे नाही”, असे सरळ विधान त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. शिवसेना किंवा संघाचे हिंदुत्व व्यापक आहे, ते सर्वसमावेशक आहे. त्यात मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, महिलांचे हक्क अशा पुरोगामी विचारांना स्थान आहे. संघ किंवा शिवसेना तालिबानी विचारांचे असते तर या देशात तिहेरी तलाकविरुद्ध कायदे झाले नसते व लाखो मुसलमान महिलांना स्वातंत्र्याची किरणे दिसली नसती.
संघाची स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका संशयास्पद असल्याचा आक्षेप काही विरोधक घेत असतात. तो मुद्दा बाजूला ठेवा; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राष्ट्रीय बाण्याची संघटना आहे, याबाबत दुमत असण्याची शक्यता नाही. देशातील बहुतांश लोकसंख्या ही धर्मनिरपेक्ष आहे. ती सभ्य असून एकमेकांचा आदर करते. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करू शकत नसल्याचे जावेद अख्तर म्हणतात ते बरोबर आहे. हिंदुस्थानात हिंदुत्ववादी विचार हा पूर्वापार आहे. कारण रामायण, महाभारत हा हिंदुत्वाचा आधार आहे.
जगातील प्रत्येक राष्ट्र आज धर्माच्या पायावर उभे आहे. चीन, श्रीलंकेसारख्या राष्ट्रांचा अधिकृत धर्म बौद्ध, अमेरिका, युरोपियन राष्ट्रे ख्रिश्चन, तर बाकी सर्व राष्ट्रे ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हणून आपापल्या धर्माची शेखी मिरवीत आहेत; पण जगाच्या पाठीवर एक तरी हिंदू राष्ट्र आहे काय? हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदू असूनही ते राष्ट्र आज धर्मनिरपेक्षतेचाच झेंडा फडकवून उभे आहे. बहुसंख्य हिंदूंना सतत डावलले जाऊ नये हीच एक माफक अपेक्षा त्यांची आहे. जावेद अख्तर, आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे ना?
(Shivsena MP Sanjay Raut Slam javed akhtar statement RSS Like Taliban)
हे ही वाचा :
जावेद अख्तर म्हणाले, आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दल तालिबानसारखेच, भाजपकडून माफीची मागणी