BREAKING : संजय राऊतांच्या पत्नीला ईडीचं समन्स, 29 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. (Sanjay Raut Wife Varsha Raut Summons By ED)
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने संजय राऊतांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी मला याबाबत काहीही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया दिली. (Sanjay Raut Wife Varsha Raut Summons By ED)
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नुकतंच ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहेत. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
“मला याची काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही माहिती नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 27, 2020
विरोधात गेले तर अशाप्रकारची कारवाई – सचिन सावंत
“भाजपचे जे अलिशान कार्यालये आहेत त्यामध्ये ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी कार्यालये शिफ्ट करावे. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी. ईडी भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजपचे विरोधी आहेत म्हणून जुने प्रकरण उकळून काढून केवळ त्रास दिला जातोय. जनतेलाही हे समजलं आहे. ईडीने आता नाटकबाजी करण्यापेक्षा भाजपच्या विरोधकांसाठी आम्ही करत आहोत ते अधिकृतपणे सांगावं,”अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली.
“प्रताप सरनाईक यांचं प्रकरण बघितलं तर 2014 साली टॉप सेक्युरिटीला एमएमआरडीएने कंत्राट दिलं. 2017 साली ते पुन्हा दिलं गेलं. त्यावेळी फडणीस सरकार होतं. फडणवीस एमएमआरडीएचे अध्यक्ष होते. त्यांनी स्वत: कंत्राट दिलं. पण ते का दिलं म्हणून त्यांना विचारलं जात नाही.”
“खडसेंचं प्रकरण फार पूर्वीचं आहे. तेव्हा का तपास केला नाही. संजय राऊत यांचं प्रकरणदेखील चार-पाच वर्षांपूर्वीचं आहे. बरोबर होते तेव्हा वेगळी परिस्थिती होती. मात्र, आता विरोधात गेले तर अशाप्रकारच्या कारवाई होत आहे. त्यामुळे ईडीचा उपयोग सरळसरळ राजकीय कारणासाठी होतोय. हे लपून राहिलेलं नाही. भाजपने कमरेचं गुंडाळलेलं डोक्याला लावलेलं आहे,” असेही सचिन सावंत म्हणाले. (Sanjay Raut Wife Varsha Raut Summons By ED)
पदवीधर मतदारसंघाचे निकाल आले होते, त्यावेळेला मी स्वत: म्हटलं होतं, आता ईडीचा वापर केला जाईल. कारण त्यांना कळून चुकलंय की महाविकास आघाडीसमोर आपली गय लागणार नाही. आपण पुढच्या सर्व निवडणुका हरणार आहोत. त्यामुळे हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजप लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रकार करत आहे.
लोकशाहीसाठी भाजपचा प्रचंड धोका आहे, त्यामुळेच महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाले. तो धोका तुम्हाला वेळोवेळी दिसतोय. आवाज बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याविरोधात आम्ही सर्वजण एकत्र येऊन लढणार. भाजपकडून लोकशाहीला धोका हे जनतेला माहिती आहे,” असेही सचिन सावंतांनी सांगितले. (Sanjay Raut Wife Varsha Raut Summons By ED)
संबंधित बातम्या :
शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये, अशोक चव्हाणांनी राऊतांना फटकारलं
भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट