मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत
शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह समोर आला. | Sanjay Raut
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर आता दिल्लीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. अशातच आता शिवसेना या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. (PM Narendra Modi should take initiative to talk with farmers)
संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या विचारात असल्याचे सांगितले. यासंदर्भात मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेवेळी शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह समोर आला. त्यामुळे मी सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भेटण्याचा विचार करत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
‘मोदींनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला तर आंदोलनावर तोडगा निघेल’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांशी चर्चेला तयार आहोत, ही घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. पंतप्रधानांनी ही भूमिका 60 दिवसांपूर्वीच घ्यायला पाहिजे होती.
सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात फक्त एका फोन कॉलचे अंतर असल्याचे म्हणाले. मग पंतप्रधान मोदी यांनीच पुढाकार घेऊन शेतकरी नेत्यांना फोन करावा. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून आश्वासन दिले तरच या आंदोलनावर तोडगा निघेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. शेतकरी नेते आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पंतप्रधानपदाविषयी आदर आहे. त्यामुळे ते मोदींचा शब्द डावलणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.
पश्चिम उत्तर प्रदेशात शुक्रवारी दडपशाहीने शेतकरी आंदोलन उखडून टाकण्याचे प्रयत्न झाले. यावेळी पोलिसांनी आणि भाजप समर्थक जमावाने शेतकऱ्यांवर लाठीमार आणि दगडफेक केली. त्यानंतर हे आंदोलन संपेल असे वाटत असतानाच आंदोलकांनी राकेश टिकेत यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले. त्यानंतर याठिकाणी पुन्हा मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. तेव्हा पोलिसांनी येथून काढता पाय घेतला. कोणत्याही बाजूने दगडफेक झाली तरी आपल्याच लोकांची डोकी फुटणार आहेत, हे भाजपने लक्षात घ्यायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
‘चर्चा करताना शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार नको’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांशी चर्चा करतील तेव्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर काळ्या कृषी कायद्याची टांगती तलवार असता कामा नये. त्यामुळे हे कायदे रद्द करूनच शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे राऊत यांनी म्हटले. शेतकरी हा काही राजकारणी नाही. तो त्याच्या भावी पिढ्यांसाठी लढतोय. हे शेतकरी कोणत्या प्रांताचे, धर्माचे किंवा जातीचे आहेत, हे महत्त्वाचे नाही. हा राष्ट्रीय लढा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
विरोधक म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे परत घ्या, मोदी म्हणाले…
‘राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही’, स्मृती इराणी भडकल्या
(PM Narendra Modi should take initiative to talk with farmers)