मुंबई : “यूपीए म्हणजे भ्रष्टाचार. अण्णा हजारेंनी एवढं मोठं आंदोलन तुमच्याविरुद्ध उभ केलं. त्यामुळे देशातील सत्ता बदलली. एका आशेने मोदींना पंतप्रधान बनवलं. भारताची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. सर्वसामान्य माणूस सुखी झाल्यावर तुम्हाला लोकशाही आठवली. लोकशाही आहे म्हणून एवढ्या राज्यात तुमची सरकारं सत्तेवर आली. लोकशाही भारताचा आत्मा आहे. त्याचा वापर तुम्हाला भ्ष्टाचारी लोकांना करता येणार नाही” अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी केली. . “प्रत्येकाने विचार केला पाहिजे, यूपीएवरुन इंडिया हे नाव का केलं?. भारताच्या जनतेने तुम्हाला कधी स्वीकारलेलं नाही. भारताची संस्कृती तुम्हाला मान्य नाही. काश्मीर भारताचा भाग आहे, त्यासाठी कलम 370 हटवलं. हे तुम्हाला मान्य नाही.
राजकारण विचारधारेवर चालतं. एक टि्वट राहुल गांधी यांच्याबद्दल केलं जातं. दुसरं टि्वट अरविंद केजरीवाल आणि तिसर टि्वट नितीश कुमार यांच्याबद्दल केलं जातं. कालपर्यंत हीच लोकं महाराष्ट्राचा द्वेष करत होती” अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. “महाराष्ट्रात काही घडलं की, हेच लोक बाळासाहेबांविरुद्ध बोलत होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत केला. त्या बाळासाहेबांच्या मुंबईत जी लाचारी चालू आहे, ती आम्हाला मान्य नाही. एकवर्षापूर्वी सुद्धा मान्य नव्हती. आज बाळासाहेबांच्या विचारांवर महाराष्ट्राच सरकार बनलय. जे मुद्दे येतील, त्याला उत्तर द्यायला तिन्ही पक्ष समर्थ आहेत. सध्या जे सुरु आहे, ती लाचारी महाराष्ट्राला मान्य आहे का? हा आमचा सवाल आहे” असं दीपक केसरकर म्हणाले.
“आम्हाला कोणावर टीका करायची नाहीय. काँग्रेसने भष्टाचार केला, यूपीए नाव बदनाम झालं. म्हणून फक्त नाव बदललं आहे. आतली लोक तीच आहेत. भारताची प्रगती थांबली तरी चालेल, मोदीसारखा सक्षम नेता नको, अशी भूमिका घेऊन, कोणी काम करणार असेल, तर ते भारताला मान्य नाहीय. 9 वर्षापासून भारतातील, जगभरातील जनतेने प्रगती बघितली आहे, म्हणून चीनची गुंतवणूक थांबली असून ती गुंतवणूक आता भारतात येत आहे” असं दीपक केसरकर म्हणाले.