संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर निशाणा; म्हणाले, हिंदूंवर अत्याचार होत असताना…
Sanjay Raut on Bangladesh Hindu News : बांग्लादेशमध्ये हिंदू लोकांवर अत्याचार होत असल्याचं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी बांग्लादेशमधील सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.वाचा सविस्तर बातमी...

बांग्लादेशमध्ये हिंदू लोकांवर होत असलेल्या अत्याचारांवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. पण भाजप त्यावर काही बोलत नाही. फक्त सचिव लेव्हलला चर्चा करत आहेत. पाकिस्तानबाबत चर्चेला सचिवांना पाठवता का? पाकिस्तानमध्ये असं झालं असतं तर मोदींनी इंडिया गेटवर उभं राहून पाकिस्तानात घुसून मारू अस भाषण मोदींनी केलं असतं. देशभरात आंदोलन होत आहेत. मात्र त्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेही दिसत नाही. स्वतःला हिंदूंचे नेते म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांना हे चित्र विचलित करत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
बांग्लादेशातील सद्यस्थितीवर राऊत काय म्हणाले?
बांग्लादेशात हिंदू समाजावर ज्या प्रकारचे हल्ले सुरु आहेत. ज्या प्रकारे त्यांचं रक्त सांडलं जात आहे. ज्या प्रकारे त्यांना देश सोडण्यास भाग पाडलं जात आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात आम्ही टीका केली नसून तिथली व्यथा आम्ही मांडली आहे. आणि चिंता व्यक्त केली आहे. बांग्लादेशमध्ये शेख हसिना यांची सत्तापालट झाल्यानंतर आणि त्याआधी सुद्धा तिकडचे कट्टरपंथी संघटना आणि लोक हे सातत्याने हिंदू समाजाला भयभीत करत राहिले. धमक्या देत राहिलेत, असं संजय राऊत म्हणालेत.
हिंदूंवर अत्याचार हा चिंतेचा विषय- राऊत
त्यांच्यावर अत्याचार करत राहिलेत. त्यांचे व्यवसाय, संस्था यांच्यावर हल्ले झाले. हिंदू लोकांची हत्या केली गेली, आताही या हत्या सुरु आहेत. हिंदू मंदिरांवर हल्ले सुरु आहेत. इस्कॉनचे पुजारी चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपांखाली अटक केली गेली. कोर्टात हिंदूंच्या बाजूने उभ्या राहिलेल्या वकिलांच्याही हत्या होत आहेत. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हा चिंतेचा विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मी 20 वर्षांपासून राज्यसभेत आहे. मी यापूर्वी अशी स्थिती कधी बघितली नाही. संविधानिक पदावर बसलेले सभापती निष्पक्ष काम करत नाहीत. आम्ही तुमचा आदर करतो, मात्र हे योग्य नाही. आम्ही लोकतंत्र वाचवण्यासाठी हा प्रस्ताव आणत आहोत, असं राऊतांनी म्हटलं आहे.