शिवसेना वाहतूक सेनेच्या अध्यक्षांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी
शिवसेना (Shivsena) पुरस्कृत शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा (Breach of modesty) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील महिलेने वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : शिवसेना (Shivsena) पुरस्कृत शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा (Breach of modesty) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील महिलेने वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा पदाधिकारी महिलेला पक्षात पद देऊन तिला सतत कार्यलयात बोलावून तिच्यासोबत विनयभंग करत होता, असा आरोप पिडीत महिलेने केला आहे. या त्रासाला कंटाळून तिने चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी करत आहेत.
वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्याची महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्याने चेंबूर येथे आपले कार्यालय सुरु केले. त्यानंतर या पदाधिकाऱ्याची तक्रारदार महिलेसोबत ओळख झाली. ओळखीनंतर महिलेचीही महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर महिलेला विनाकारण कार्यालयात बोलावून सतत तिचा विनयभंग केला जात होता. त्यामुळे महिलेने कार्यालयात जाणे बंद केले. महिलेने कार्यालायत येणे बंद केल्यामुळे पदाधिकाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप तक्रार करणाऱ्या महिलेने केला आहे.
या पदाधिकाऱ्याने जून महिन्यात महिलेला पक्षाच्या कार्यक्रमासाठी जायचे आहे, असं सांगून तिला गाडीत बसवून मानखूर्द येथील रहदारी नसलेल्या जागेवर घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने विरोध करत गाडीतून उतरत थेट रिक्षा पकडली आणि घर गाठलं. यानंतर फोन करुन पक्षात काम करायचे नाही असं पदाधिकाऱ्याने या महिलेला सांगितलं.
शरीरसंबध ठेवण्यासाठी दबाव
महिलेने पक्षात काम करण्यासाठी नकार दिल्यानंतर महिलेला शरीरसंबध ठेवण्यासाठी सतत दबाव टाकण्यात येत होता. पण महिलेकडून स्पष्ट नकार येत असल्यामुळे पदाधिकाऱ्याने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर दुबई आणि मुंबईतील अंडरवर्ल्डसोबत माझी ओळख आहे. त्यांना सांगून तुझा खून केला जाईल, अशी धमकी पदाधिकाऱ्याने महिलेला दिली होती, असं महिलेने पोलिसांना सांगितलं.