मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून गोळी सुटली?, अहवालात धक्कादायक माहिती काय?
बंदुकीसोबतच बंदुकीतून निघालेले काडतूसे आणि घटनास्थळावरून काही नमुने जप्त करण्यात आले होते. याची बॅलेस्टिक तज्ज्ञांनी चौकशी केली.
मुंबई: गणपती विसर्जनावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटात दादर पोलीस ठाण्याच्या परिसरातच प्रचंड राडा झाला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, आपल्या बंदुकीतून गोळी सुटलीच नसल्याचा दावा सरवणकर यांनी केला होता. या प्रकरणी बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल आला असून त्यात सरवरणकर यांच्याच बंदुकीतून गोळी सुटल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला होता. हे प्रकरण दादर पोलीस ठाण्यापर्यंत गेलं होतं. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड गर्दी झाली होती आणि दोन्ही गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. यावेळी सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी सुटली होती. त्यामुळे सरवणकर यांच्या विरोधात 15 सप्टेंबर रोजी आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. पोलिसांनी या प्रकरणी सदा सरवणकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सरवणकर यांच्याकडी बंदूक जप्त करण्यात आली होती.
बंदुकीसोबतच बंदुकीतून निघालेले काडतूसे आणि घटनास्थळावरून काही नमुने जप्त करण्यात आले होते. याची बॅलेस्टिक तज्ज्ञांनी चौकशी केली. त्याचा अहवाल या तज्ज्ञांनी तयार केला आहे. या अहवालानुसार सरवणकर यांच्या बंदुकीतूनच गोळी सुटल्याचं स्पष्ट झालं आहे.
त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरवणकर यांच्यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर सरवणकर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
विसर्जनासाठी प्रभादेवीत शिवसेनेने गणेश भक्तांच्या स्वागतासाठी एक मंडप टाकला होता. त्याच मंडपाच्या बाजूला शिंदे गटानेही आपला मंडप टाकला होता. यावेळी शिंदे गटाच्या लोकांनी या मंडपातून शिवसेनेविरोधात टीका केली. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर दोन्ही गटात राडा झाला होता. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत प्रभादेवीत गोंधळ निर्माण झाला होता.