भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, आणखी एक मंत्रिपद…; शिंदे गटाच्या नेत्याकडून जाहीर नाराजी व्यक्त
Shrirang Barne on BJP Shivsena Yuti and NDA Government : शिवसेना शिंद गटात मंत्रिपदावरून नाराजी असल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेच्या खासदाराने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. भाजपने शिवसेनेवर अन्याय केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर...
एनडीएचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे. काल संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्यासह 72 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नेत्यांमध्ये मात्र नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना श्रीरंग बारणे यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपने शिवसेनेवर अन्याय केला. शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, असं श्रीरंग बारणे म्हणाले.
मंत्रिपदावर बारणे काय म्हणाले?
शिवसेना हा महायुतीचा खूप जुना घटक पक्ष आहे. काही लोक महायुतीतून बाहेर पडले नंतर पुन्हा युतीत आले परंतू शिवसेना हा महायुतीतील जुना आणि महत्वाचा घटक पक्ष आहे. चिराग पासवान यांनी बिहार लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढली होती. ते आता पुन्हा एकदा महायुतीत आले आहेत. लोकसभेच्या पाच जागा त्यांनी लढवल्या आणि सर्व जागा जिंकल्या. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. शिवसेनेला मात्र राज्यमंत्रिपद देण्यात आलं, असं श्रीरंग बारणे म्हणाले.
“प्रतापराव जाधव हे चार टर्म खासदार…”
कुमार स्वामी यांचे दोन खासदार निवडून आले. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. जीतन राम मांझी हे एकटेच निवडून आले आहेत. तरी त्यांनी कॅबिनेटमंत्रिपद देण्यात आलं. परंतू शिवसेना पक्षाला 34 व्या स्थानी शपथ घ्यावी लागली आणि राज्यमंत्रिपदी समाधान मानावं लागलंमी तीन टर्म खासदार राहिलेलो आहे. प्रतापराव जाधव हे चार टर्म खासदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही, असं बारणेंनी म्हटलं.
एनडीए सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानंतर आता अजित पवार गटाने ही अन्याय झाल्याची खदखद बोलून दाखवली आहे. सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटायच्या आतच मंत्री पदावरून नाराजीनाट्य सुरू झालेलं आहे. अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी खदखद व्यक्त केली आहे. इतर राज्यातील घटक पक्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील घटक पक्षावर अन्याय झालाय, असं म्हणत बनसोडेंनी नाराजी व्यक्त केली.