…ईडी पुन्हा कोणाच्या कुटुंबाला त्रास देणार नाही, भास्कर जाधवांनी ईडीलाच अंगावर घेतले
न्यायालयाने ईडीवर ताशेरे ओढल्यानंतर आता ईडी कोणाच्याही कुटुंबाला असा आता त्रास देणार नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
मुंबईः खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला निशाणा करत त्यांच्यावरही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. तर दुसरीकडे न्यायालयाने संजय राऊत यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे ईडीवर ओढल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ईडीने पुन्हा एकदा त्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर ईडीची याचिका फेटाळून लावत संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यावेळी ईडीवरही न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्यानंतर भास्कर जाधव यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, कोर्टाने इडीवर ओढलेले ताशेरे बघून आता तरी पुढे ईडी अशा प्रकारची कोणाच्या कुटुंबाला त्रास होईल अशी कारवाई करणार नाही अशी टीका त्यांनी केली होती.
खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यावर नेत्यांवर होणाऱ्या कारवाईबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ईडी कुणाच्या तरी दबावाखाली येऊन कोणालाही अटक करते आहे.
त्यामुळे आम्हालाच नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मनात अटकेची भीती असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, फडणवीस हे कुणाच्या चुकीच्या बोलण्याचे समर्थन करत नाहीत, मात्र ते पाठीशी उभे राहतात, म्हणजे काय करतात असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिंदे गटातील नेत्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल बोलताना म्हणाले की, गुलाबराव पाटील आणि सत्तार यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा सुसंस्कृतपणाचा धाक होता.
आता कुणाचच राहिला नाही, त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत असा टोलाही त्यांनी अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांना लगावला.
भास्कर जाधव यांनी ईडीच्या कारवाईबद्दल बोलताना या भाजपच्या कुटील कारस्थानाबद्दल जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपचा छोटे-मोठे प्रांतिक पक्ष संपवण्याच्या डाव नव्हे तर तसा कार्यक्रम असल्याची टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.
शिवसेनेतून बंडखोरी करुन जे आमदार शिंदे गटात सामील झाले त्यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. त्यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, 40 आमदार गेले असेल तरी 40 हजार नव्या दमाचे कार्यकर्ते आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे शिवसेनेला काहीच फरक पडला नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.