मुंबई : वसई-विरार परिसरातील पाणी टंचाई लवकरच दूर होणार आहे. एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू केले आहे. या प्रकल्पातून नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मार्च 2023 मध्ये करण्याची योजना आहे. या पहिल्या टप्प्यातून वसई-विरार शहर महानगरपालिकेला 185 दशलक्ष लीटर क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल आहे. वसई-विरार परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे यासाठी एमएमआरडीए 403 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारत आहे.
सूर्या पाणी प्रकल्पातील उदंचन केंद्राचे काम 98% आणि जलशुध्दीकरण केंद्राचे काम 94 % पूर्ण झाले आहे. प्रकल्पात एकूण 88 किलोमीटरची पाईपलाईन टाकली जात आहे, तसेच प्रकल्पात दोन बोगदे असणार आहेत. त्यापैकी मेंढवणखिंड बोगद्याचे काम पूर्ण झाले असून तुंगारेश्वर बोगद्याचे काम जलदगतीने सुरू आहे. प्रकल्पाच्या पहिल्या भागाची 95 % प्रगती झाली आहे तर संपूर्ण प्रकल्प 82 % पूर्ण झाला आहे.
सूर्या प्रकल्प हा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, कारण पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच एमएमआरडीए मुंबई महानगराच्या पश्चिम उप-प्रदेशासाठी पहिला पाणीपुरवठा प्रकल्प साकारत आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून मार्च 2023 मध्ये वसई-विरार शहर महानगरपालीकेला पाणी पुरवठा केला जाईल, तसेच दुसऱ्या टप्प्यातून मीरा-भाईंदर महानगरपालीकेला येत्या काही महिन्यांत 218 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.