बदलापुर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला आहे. आरोपी अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल खेचून तीन राउंड फायर केले. यामध्ये API निलेश मोरे जखमी झाले, त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला. मात्र हे प्रकरण दाबण्यासाठी अक्षय याला पोलिसांनी मारल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणावरून सरकारवर आरोप केले जात असताना मोठी अपडेट समोर आली आहे.
अक्षय शिंदेच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार आहे. आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या देखरेखीखाली तपास होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त तपास पथकाचे प्रमुख असणार आहेत. गुन्हे शाखेच्या ताब्यात असताना अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपीकडून तपास होणार आहे.
आरोपी अक्षय अण्णा शिंदे, वय 24, पॉक्सो कायद्याखाली विविध गुन्ह्यांसाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी होता. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला ट्रान्सफर वॉरंट सह ताब्यात घेतले. मुंब्रा बायपासजवळ पोलिसांच्या गाडीमध्ये आरोपीने पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल खेचून तीन राउंड फायर केले. फायरमधून एक राउंड सपोनि निलेश मोरे यांच्या मांडीला लागला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला, ज्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी झाला. जखमी अवस्थेत आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे केले जाणार आहे.
पोलिसांवर दबाव होता. येथील राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्वाची होती आणि त्याला ठरवून स्वतःला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का? आम्ही उच्च न्यायालयाच्या लक्षात उद्याच हा सगळे आणून देणार असल्याचं वकील असीम सरोदे यांनी केला आहे.