Special story | राज्यातील 5 महानगरपालिकांची रणधुमाळी!
औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महापालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूर आणि पुण्यासह औरंगाबादची जागाही आपल्या खिशात घातली. पुण्याची शिक्षक मतदारसंघाची जागेवरही राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. तर भाजपच्या गोटात आत्मपरिक्षणांचं बैठक सत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील 5 बड्या महापालिका निवडणुकीचं रणशिंग यंदा फुंकलं जाण्याची शक्यता आहे. (Special report on 5 municipal corporation elections in the state)
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. पण आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनंतर औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महापालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्याचबरोबर राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारीच्या आसपास निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये राज्यात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळू शकते.
कोल्हापूर महानगरपालिका –
कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या आघाडीला शिवसेनेचीही साथ आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. असं असलं तरी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. राज्याचा आणि कोल्हापूर महापालिकेचा गाडा एकाच वेळी हाकणं शक्य नसल्यानं त्यांनी काही कारभाऱ्यांना कामाला लावलं आहे. तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची पार्श्वभूमी पाहायची झाल्यास गेल्या निवडणुकीत भाजपने ताराराणी आघाडीशी युती करुन सत्तेचा सोपान गाठण्याचा प्रयत्न केला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचनं शिवसेनेच्या 4 सदस्यांना सोपत घेत भाजपच्या तोंडचा घास हिरावला. गेल्या महापालिका निवडणुकीवेळी राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती. पण आता चित्र उलटं आहे. ताराराणी आघाडीचे प्रमुख महाडिक कुटुंब आता भाजपवासी झालं आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढते की एकमेकांसमोर शड्डू ठोकले जातात हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नवे डाव आखणार हे स्पष्ट आहे. त्याला स्थानिक भाजप नेते आणि चंद्रकांत पाटील कसे सामोरे जातात, यावर कोल्हापूर महापालिकेचा निकाल अवलंबून असणार आहे.
कोल्हापूर महापालिकेतील पक्षीय बलाबल –
काँग्रेस- 30 राष्ट्रवादी- 15 शिवसेना- 04 ताराराणी आघाडी- 19 भाजप- 13 एकूण जागा – 81
औरंगाबाद महापालिका –
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेनं पुन्हा एकदा लावून धरली आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सुपर संभाजीनगर नावाचा डिजीटल फलक लावल्यानंतर हा वाद सुरु झाला. त्यात प्रशासकीय पातळीवरही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरुन हालचाली सुरु आहेत. विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. तर पालकमंत्री सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनंतर असा उल्लेख केल्यानं तो वाद अजूनच पेटल्याचं चित्र आहे.
“दुसरीकडे संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी ही विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा मुख्य हेतू आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये अशाप्रकारे शहरांचं नाव बदलण्याचं ठरलेलं नाही”, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध केला आहे. तर याच मुद्द्यांवरुन भाजपकडून शिवसेनेला सातत्यानं डिवचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाणीपुरवठा योजना म्हणजे प्रचाराची नांदी?
औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन नुकतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. पण ऐन निवडणूक काळात पाण्याचा मुद्दा बाजूला पडावा अशी रणनिती आखली जात असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन हे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची नांदी मानली जात आहे.
दरम्यान, औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. तर काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत काँग्रेसही स्वबळावर शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय. (Special report on 5 municipal corporation elections in the state)
औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना – 29 भाजप – 22 एमआयएम – 25 कॉंग्रेस – 10 राष्ट्रवादी – 03 बसप – 05 रिपब्लिकन पक्ष – 01 अपक्ष – 18
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका –
गेल्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर हे चित्र पालटलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं चित्र यंदा कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळू शकतं. तर दुसरीकडे भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून याबाबत अद्याप कुठलीही ठोक भूमिका मांडण्यात आलेली नाही.
कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यास शिवसेनेला हिंदुत्ववादी मतांचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केडीएमसीमध्ये महाविकास आघाडी झाल्यास हिंदुत्ववादी मतं शिवसेनेपासून दूर जाण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना – 52 भाजप – 42 काँग्रेस – 04 राष्ट्रवादी काँग्रेस – 02 मनसे – 09 एमआयएम – 01 एकूण – 122
नवी मुंबई महानगरपालिका –
गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली नवी मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या मदतीनं भाजपचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान, नवी मुंबई, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मनं वळवून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
राष्ट्रवादीचे नवी मुंबई प्रभारी आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमिल कौशिक यांनी एकत्र निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुनही नवी मुंबईतील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त मंडळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी कोळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचे नावाचा आग्रह केला जात आहे. या विमानतळाच्या नामांतराच्या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.
दुसरीकडे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे. नवी मुंबईतील आतापर्यंत पाच नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. हा भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का असल्याचं मानलं जात असून त्यामुळे नाईक गोटात खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता असली तरी नाईक यांनी मात्र, जे गेले त्यांना शुभेच्छा, असं म्हणत या बंडखोरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप – 51 शिवसेना – 45 काँग्रेस – 13 अपक्ष – 04 राष्ट्रवादी काँग्रेस – 00 एकूण – 111
वसई-विरार महानगरपालिका –
वसई-विरार महानगरपालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचं एकहाती वर्चस्व राहिलेलं आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई-विरारच्या मतदारांनी गेल्या निवडणुकीत बविआला एकहाती विजय मिळवून दिला होता. वसई-विरारमध्ये सत्ताधारी महिविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी शिवसेनेचं बोटावर मोजण्याइतकं स्थान आहे. बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तिथे नसल्यात जमा आहे. असं असलं तरी यंदाची महापालिका निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुजन विकास आघाडी, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप अशी ही निवडणूक पाहायला मिळू शकते. तर मनसेनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरु केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं ताकद लावली होती. पण वसई-विरारच्या मतदारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. वसई विरार महापालिका क्षेत्रात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात वसईमध्ये हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्यातून क्षितीज ठाकूर तर बोईसरमधून राजेश पाटील हे आमदार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे कोरोना काळात बहुजन विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सोडले तर अन्य एकाही पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता लोकांच्या मतदीला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं नाही. बविआच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी अनेक सामाजिक संस्थांच्या सहाय्यानं गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे इथं पुन्हा एकदा बविआचं वर्चस्व पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको.
वसई-विरार महापालिकेतील पक्षीय बलाबल
बविआ – 107 शिवसेना – 05 भाजप – 01 मनसे – 01 एकूण – 115
संबंधित बातम्या:
महापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी, मंगळवारी राज्यस्तरीय बैठक
मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेस वाद शिगेला! कशी होणार महाआघाडी?
Special report on 5 municipal corporation elections in the state