मुंबई : मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे (Makar Sankranti 2021). या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांति म्हटलं जातं. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात (Makar Sankranti 2021).
मकर संक्रांत सण दरवर्षी एकाच तारखेला का येतो? असा प्रश्न नक्कीच आपल्यातील अनेकांना पडला असेल. हिंदु संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो एकाच तारखेला येतो. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या (सूर्याच्या स्थानावर) कॅलेंडरनुसार येतो. इतर सर्व सण हे चंद्राच्या कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात, त्यामुळे ते दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येतात.
मकर संक्रांत या सणाचा शेतीशीदेखील संबंध आहे. म्हणून या दिवशी विवाहित महिला एकमेकींना शेतात आलेल्या धान्याचे वाण देतात. या दिवशी स्त्रिया साज-शृंगार करुन मंदिरात जातात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरुन त्या देवाला अर्पण करतात.
आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. 21 मार्च ते 21 जूनपर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. तर 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत सूर्य दक्षिण दिशेला सरकतो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. तर 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेला उगवतो. या दोन तारखांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात. या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात.
मकर संक्रांतच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरु होते. अर्थातचं त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरुच असते. पृथ्वीवरुन पाहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्योदयाचे स्थान दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या राशीला मकर संक्रांत म्हणतात. या दिवशी सूर्य धनू राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. पृथ्वीची जी बाजू सूर्याच्या जवळ असते तिथे उन्हाळा असतो. तर जी बाजू दूर असते तिथे हिवाळा असतो. कमी-जास्त तापमानामुळे ऋतू होतात. जर अक्ष कललेला नसता तर ऋतू झालेच नसते (Makar Sankranti 2021).
यावर्षी मकर संक्रांतला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 ही वेळ शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत पूजाविधी करु शकता. तसेतर नेहमी हा सण 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, एखाद्या वर्षी ही तारीख मागे-पुढे होते. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. पौराणिक कथेनुसार, ही देवता दरवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते.
मकर संक्रांतच्या दिवशी बरेच महत्वाचे ग्रह एकत्रित येतात. या दिवशी सूर्य, शनि, गुरु, बुध आणि चंद्र मकर राशीत राहतील. जे शुभ योग निर्माण करतात. म्हणूनच या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य, आनंद आणि समृद्धी आणते.
मकर संक्रातच्या दिवशी अंघोळ करुन सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी महिला पूजा करतात. नंतर विवाहित स्त्रिया सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरतात. हे सुगडं पाटावर ठेवून त्या भोवती रांगोळी काढली जाते. यातील एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीजवळ ठेवलं जातं. त्यानंतर किमान पाच सवाष्णींना वाण देतात. या दिवशी हळदीकुंकू समारंभ करुन तीळगूळ वाटतात. तुम्ही मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ करु शकता.
संक्रांतिला तीळाचे फार महत्त्व आहे. मकर संक्रांतला तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरुन त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते. पण या गोष्टीलाही वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने तीळ आणि गुळाने शरिराला उब मिळते. म्हणून या दिवशी तीळगुळ खाल्ल जातं.
1) तिळाचे महत्व :
मकर संक्रात या सणाच्या दिवशी तिळाने सूर्य, विष्णू, शनिदेवाची पूजा केली जाते. खरतर शनि महाराजांनी आपल्या वडिलांना राग आल्यावर शांत ठेवण्यासाठी तिळाची पूजा केली होती. तिळाची पूजा केल्याने शनि महाराजांना सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यांनी शनिमहाराजांना वरदान दिले की, जेव्हा कधी मी मकर राशीत प्रवेश करेन त्यादिवशी तिळाद्वारे माझी पूजा कर. यामुळे शनिचा दोष नष्ट होऊन सुख, समृद्धी आणि शांती लाभेल, असं मानतात.
2) तुपाचे महत्व :
ज्योतिषशास्त्रानुसार तुपाचे महत्व सूर्य आणि गुरु ग्रहाशी संबंधित आहे. शास्त्रांनुसार मकर संक्रांतला तुपाचा प्रसाद खाल्यावर विविध भोगयातनेतून मोक्षप्राप्ती मिळते. याच कारणामुळे खिचडीत तूप मिसळून पुजाऱ्यांना महाप्रसाद दिला जातो. तुपाचे दिवे पेटवून सूर्यदेवाची आणि विष्णुदेवाची पूजा केल्यावर सुख समृद्धीचा अलभ्य लाभ मिळतो , असं मानतात.
3) गुळाचे महत्व :
ज्योतिषशास्त्रानुसार गुळाचेही महत्व अधिक असल्याचे सांगितले जाते. गूळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य, शनि आणि गुरु ग्रहांचे कार्य शुभ होते. तीळगूळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होऊन सर्वत्र शांती पसरते आणि शनिमहाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो, असं मानतात.
संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळ्या वस्त्रांचा या दिवशी वापर केला जातो. नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणाऱ्या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळ्या रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात आणि सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तीळगूळाच्या वड्या किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते.
भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो, मात्र काळे कपडे परिधान करुन साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरुष काळ्या रंगाचा कुर्ता पायजामा परिधान करतात (Makar Sankranti 2021).
संक्रांत कोसळणे म्हणजे खूप मोठं संकट येणे. विकीपिडीयात ‘पानिपतची तिसरी लढाई’ : ‘साहित्यात व दैनंदिन जीवनात’ याखाली ‘संक्रांत कोसळणे’ हा वाक्प्रचार पानिपताने मराठीला दिला असा उल्लेख आहे. पानिपतचं युद्ध म्हणजे महाराष्ट्रातील जनमानसात अपयशाचे प्रतीक आहे. हे युद्ध संक्रातिच्या दिवशी झाल्यामुळे यातून ‘संक्रांत कोसळली’ (खूप मोठे संकट आले) अशा वाक्प्रचाराचा जन्म झाला.
संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे. यामुळे सर्व लोक हैराण झाले होते. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करुन त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होउन सर्व जनता सुखी झाली, अशी आख्यायिका आहे. या देवीला अनेक हात आहेत. एखाद्या वाहनावर बसून वस्त्रालंकारानी सुशोभित होऊन, हातात विविध शस्त्रे घेऊन ती एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते. असे वर्णन पंचांगात दिलेले आहे. संक्रांतीचे वर्णन प्रत्येक वर्षी निरनिराळे असते. विशेष म्हणजे संक्रांत देवीस ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींची महागाई होते असे मानतात.
Makar Sankranti 2021
संबंधित बातम्या :