मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपकडून आता संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली चालू झाल्या आहे. नुकताच शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government)मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, त्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule as BJP state president) यांचीही नुकताच निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता भाजपकडून नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवीन प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता भाजपकडून प्रदेश कार्यकारिणीच्या हालचाली वाढल्या आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप कार्यकारिणीचीही निवड होण्याची शक्यता आहे.
कार्यकारिणीतील नावे निश्चित करण्याबाबतही नागपूरच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजपच्या नव्या कार्यकारिणीमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे भाजप कार्यकर्त्यांची नजरा लागून राहिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून नेहमी संघटनाबांधणीवर जोरदार पणे काम केले जाते. आता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपच्या कार्यकारिणीची निवड होण्याची शक्यता आहे. या कार्यकारिणीचा निर्णय नागपूरमधूनही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपमधील कोणत्या नेत्याला संधी मिळणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.
प्रदेश संघटन सरचिटणीस हे भाजपमध्ये अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. या पदावर सध्या आमदार श्रीकांत भारतीय आहेत. त्यांनाच या पदावर कायम ठेवायचे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आलेली प्रचारक व्यक्ती परंपरेनुसार या पदावर नेमायची याबाबतचा निर्णयही नागपूरच्या बैठकीत होणार आहे.
राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्तीही लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला 8, तर शिंदे गटाला 4 जागा दिल्या जातील असंही सूत्रांनी सांगितले.