ST Strike: ‘माझे आईवडील, मुलगी आतमध्ये आहेत, प्लीज…’ एसटी कर्मचाऱ्यांचा सुप्रिया सुळेंना घेराव
St Workers Agitation LIVE Updates : एसटी कर्मचाऱ्यांनी धडक दिल्यानंतर सुप्रिया सुळे बातचीत करण्यासाठी बाहेर आल्या. मी ऐकायला तयार आहे. मी बोलायला तयार आहे. माझी हात जोडून विनंती आहे, असं त्यांनी हात जोडून घेराव घातलेल्यांना उद्देशून म्हटलंय.
मुंबई : एसटी संप (St Employee Strike) पुन्हा एकदा चिघळला. एसटी संपातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी थेट सिल्वर ओक (Silver Oak, Sharad Pawar Residence) गाठून शरद पवारांच्या घरावर धडक दिली. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना शांत करण्याचा प्रयत्नही केला. ‘माझी ऐकायची तयारी आहे. तुम्ही फक्त शांतपणे बसा. मी सगळं ऐकून घ्यायला आली आहे’, असं हात जोडून सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आंदोलकांना आवाहन केलं. मात्र संतापलेल्या महिलांनी सुप्रिया सुळेंना घेराव घालत, त्यांना जाब विचारला. या घेरावातही सुप्रिया सुळे यांनी हात जोडून संपकरी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
या घेरावातून बाहेर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय, की..
शांततेच्या मार्गानं मी त्यांना अनेकवेळा नम्रपणे विनंती केलेली आहे. हात जोडलेत. मी त्यांच्याशी आता बोलायला तयार आहे. माझे आईवडील, माझी मुलगी घरामध्ये आहे. मी या सगळ्यांसोबत या क्षणी चर्चा करायला तयार आहे. मी पुढच्या मिनिटाला चर्चेला बसायला तयार आहे. माझी तुम्हाला विनम्रपणे विनंती आहे.. मी माझ्या आईवडील आणि मुलीला भेटून येते आणि मग मी तुमच्याशी बोलते.
नेमकं घडलं काय?
एसटी कर्मचाऱ्यांनी धडक दिल्यानंतर सुप्रिया सुळे बातचीत करण्यासाठी बाहेर आल्या. मी ऐकायला तयार आहे. मी बोलायला तयार आहे. माझी हात जोडून विनंती आहे, असं त्यांनी घेराव घातलेल्यांना उद्देशून म्हटलं. दरम्यान, तुम्ही काय केलं? तुम्ही हा निर्णय का घेतला? असा प्रश्नही यावेळी संपातील कर्मचारी महिलांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून, ‘अहो, मी ऐकायला तयार आहे, माझी ऐकायची तयारी आहे’, असं म्हटलंय. ‘शांत बसा, अहो ताई.. सगळ्यांनी बसा…’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी यावेळी सगळ्या संतापलेल्या कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला.
आक्रोश कायम
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्यानंतरही संपातील कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. कर्मचाऱ्यांबाबत एवढा कळवळा होता, तर कर्मचाऱ्यांचं रक्त प्यायला नको होतं, अशा शब्दांत संपातील कर्मचाऱ्यांनी यावेळी सुनावलं आहे.
आंदोलन का?
एसटी संप हा मुळातच विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी करण्यात आला होता. मात्र ही मागणी सरकारनं फेटाळून लावली होती. मात्र संपातील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. गुरुवारी न्यायालयानं संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू 22 एप्रिल पर्यंतचा वेळ दिला होता. सोबत ग्रॅच्युएटी, पेन्शन, पीएफ या मागण्याही मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र विलीनीकरणाची प्रमुख मागणी मान्य करणं शक्य नसल्यानं सरकारनं न्यायालयातही स्पष्ट केलं होतं. त्यामुळे संपातील कर्मचारी संपातले आहेत.