ST workers strike : प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक, पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा
मागण्यांची दखल गणपतीच्या सणापूर्वी न घेतल्यास नाईलाजास्तव संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा (ST workers Strike) इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मान्यताप्राप्त संघटनेचे 29 ऑगस्टला लाक्षणिक उपोषण उपोषण आहे. मागण्या मान्य न झाल्यास 19 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. राज्य कार्यकारीणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने एक पत्रक (Circular) काढून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढीचा दर, सातवा वेतन आयोग, वेतनवाढीतील विसंगती दूर करणे, मॅक्सिकॅब परवाने (Licenses) देऊ नये, कोविड भत्ता, कोर्ट केसेस, स्वेच्छा निवृत्ती योजना आदी मागण्या पत्रकात करण्यात आल्या आहेत. तर गणपती उत्सवानंतर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
‘थकबाकी द्यावी’
शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022पासून थकबाकीसह महागाई भत्ता 34 टक्के ऑगस्ट 2022च्या वेतनासोबत लागू करण्याचा शासन निर्णय प्रसारित झाला आहे. मात्र रा. प. कामगारांना सध्या 28 टक्केच महागाई भत्ता मिळत आहे. शासनाच्या निर्णयानुसार रा. प. कामगारांनाही जानेवारी 2022पासून 34 टक्के महागाई भत्ता थकबाकीसह ऑगस्ट 2022 ते सप्टेंबर 2022च्या वेतनासोबत देण्यात यावा.
‘शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन हवे’
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याची मागणी वारंवार करूनदेखील अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीची एप्रिलपासूनची थकबाकी कामगारांना देण्याबाबत वारंवार मागणी करूनही ती अद्याप देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर इतर आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
बेमुदत उपोषण
मागण्यांची दखल गणपतीच्या सणापूर्वी न घेतल्यास नाईलाजास्तव संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्यास 19 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा या पत्रकामार्फत देण्यात आला आहे. या पत्रकासोबतच प्रलंबित प्रश्नांची यादीदेखील संघटनेने जोडली आहे.