Gunratna Sadavarte : माझी हत्या होऊ शकते, गावदेवी पोलीस ठाण्यातून गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
पोलिसांनी मला काहीही सांगितलं नाही. मला कोणतीही नोटीस दिली नाही. मला डायरेक्ट घेऊन आले. माझ्या जिवीताला धोका आहे. माझा खून झाला तर याला गृहमंत्री जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांच्या ताब्यातून दिली आहे.
मुंबई : आज शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रमक (St Workers Agitation) आंदोलन झालं, त्याप्रकरणी आता पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तिथून सादावर्तेंना गावदेवी पोलीस ठाण्यात नेलं. मात्र पोलिसांनी मला काहीही सांगितलं नाही. मला कोणतीही नोटीस दिली नाही. मला डायरेक्ट घेऊन आले. माझ्या जिवीताला धोका आहे. माझा खून झाला तर याला गृहमंत्री जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांच्या ताब्यातून दिली आहे. तसेच माझ्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणली आहे. प्रोसिजर फॉलो झाली नाही, असेही सदावर्ते म्हणाले आहेत. तर आमच्या जीवीताला धोका आहे. गुणरत्न सदावर्तेंना काही झालं तर त्याला जबाबदार शरद पवार असतील, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सादवर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलचं तापलं आहे.
जयश्री पाटील यांची प्रतिक्रिया काय?
राष्ट्रवादीने गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राष्ट्रवादीने राज्यभर आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस ज्यावेळी घ्यायला गेले तेव्हा पोलिसांचं वर्तन योग्य नसल्याचाही आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. तसेच सदावर्तेंना काहीही होऊ शकतं, सादवर्तेंच्या जिवाला धोका आहे, माझ्या कुटुंबाला धोका आहे. आम्हाला काही झालं तर त्याला शरद पवार जबाबदार असतील असा थेट आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.
सदावर्तेंचं कुटुंब पोलीस स्टेशनला
माझ्या पतीच्या, माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे, म्हणत सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील या गावदेवी पोलीस स्टेशनला पोहोचल्या. त्यांनी तिथूनही शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. मला माझ्या वडिलांना भेटू दिलं जात नाही, मी फक्त दहा वर्षाची आहे. मला इकडे तिकडे ढकललं जातंय. माझ्या वडिलांकडे फोनही नाही, असा आरोप सादवर्तेंच्या मुलीने केला आहे. तर पोलिसांकडूनही आमच्या जिवाला धोका आहे. शरद पवारांकडून पोलिसांचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप सतत सदावर्तेंच्या पत्नीकडून करण्यात येत आहे. सदावर्तेंच्या अटकेचीही दाट शक्यता आहे. यात पोलीस चौकशीत काय समोर येतं हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.