वसईमधील तरूणीच्या हत्येची राज्य महिला आयोगाकडून दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या…
वसई येथे घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला आहे. दिवसाढवळ्या तरूणीवर हल्ला करत जागेवरच संपवलं. या घटनेने खळबळ उडाली असून राज्य महिला आयोगाकडून याची दखल घेतली गेली आहे.
मुंबईतील वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा प्रियकराने तरूणीच्या डोक्यात पान्ह्याने हल्ला करत तिला संपवलं. घटना घडली त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी मोबाईलमध्ये हत्या करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. मात्र कोणीही तरूणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल घेतली गेली आहे. रूपाली चाकणकर यांनी आरोपीवर आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे असे निर्देश दिले आहेत.
वसई येथील घडलेली घटना अतिशय हिंसक आहे. भर रस्त्यात अशी घटना घडते ही चिंताजनक आहे. अनेकांनी बघायची भूमिका घेतली. याप्रकरणी आरोपीला कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. पोलीस निरीक्षक नन्नवरे यांना फोन करून आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर आरोपीवर कडक कारवाई होईपर्यंत राज्य महिला आयोग लक्ष घालेल, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.
रूपाली चाकणकर यांचं ट्विट:-
वसईमध्ये आज भर रस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून मी स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. सखोल तपास करून आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयोग पाठपुरावा करेल. मुलांचे असे हिंसक वागणे, हत्या करण्यापर्यंत मजल जाणे आणि सोबतच अशी घटना घडत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेणे चिंताजनक असल्याचं चाकणकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, आरोपी जेव्हा तिला मारत होता तेव्हा लोक कशा प्रकारे तिच्या मरणाचा तमाशा पाहत होते. या घटनेची सखोल चौकशी होणार असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.