राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, मुख्यमंत्री कार्यालयावर वेळ न दिल्याचा आरोप
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी (11 डिसेंबर) आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला (State Minorities commission president resign).
मुंबई : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी (11 डिसेंबर) आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला (State Minorities commission president resign). यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून वेळ दिली जात नसल्याचा आरोप केला.
एकेकाळी शिवसेनेत असलेले हाजी अरफात शेख काहीकाळाने भारतीय जनता पक्षात दाखल झाले. भाजपमध्ये दाखल होताच त्यांना राज्यशासनाने राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. शेख यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याने त्यावेळी त्यांची जोरदार चर्चा झाली. त्यांनी 4 सप्टेंबर 2018 रोजी पदभार स्वीकारला.
शेख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या 4 पानी पत्रात आपल्या कारकीर्दीचा आढावाही घेतला. आपल्या पत्रात शेख म्हणाले, “तंजीमुल मुस्लिमीन सोसायटीला मशिदीसाठी दिलेला भूखंड 9 वेळा बदलण्यात आला. सध्या दिलेल्या भूखंडासाठी शासनाच्या आवश्यक परवानगी देण्यात स्थानिक पोलीस अडथळा आणत आहेत. न्यायालयाच्या आदेशालाही ते जुमानत नाहीत. यासंदर्भात आपल्या भेटीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे वारंवार संपर्क करूनही वेळ देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याचाच अर्थ अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी आपले शासन गंभीर नाही, असे मला जाणवत आहे.
या प्रश्नासोबतच अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी आपली वेळ मागत होतो. मात्र, अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपणास वेळ नसेल आणि जर अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळणार नसेल तर अशा पदावर राहण्यापेक्षा मी पदाचा राजीनामा देत आहे, असंही शेख यांनी आपल्या पत्रात नमूद केलं.