Eknath Shinde vs Shivsena: सत्तासंघर्ष नाट्याचे राज्यभरात पडसाद, कुठे एकनाथ शिंदेंसाठी पोस्टरबाजी, कुठे उद्धव ठाकरेंसाठी घोषणाबाजी, तर कुठे भाजपासाठी होमहवन

| Updated on: Jun 24, 2022 | 2:08 PM

या सत्तासंघर्षाचे पडसाद उभ्या महाराष्ट्रात उमटत आहेत. ठिकठिकाणी एकनाथ शिंदे समर्थक तर उद्धव ठाकरे शिवसेना समर्थक पोस्टरबाजी, घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तर भाजपाची सत्ता यावी यासाठी काही ठिकाणी कार्यकर्ते देव पाण्यात घालून बसले आहेत.

Eknath Shinde vs Shivsena: सत्तासंघर्ष नाट्याचे राज्यभरात पडसाद, कुठे एकनाथ शिंदेंसाठी पोस्टरबाजी, कुठे उद्धव ठाकरेंसाठी घोषणाबाजी, तर कुठे भाजपासाठी होमहवन
Follow us on

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय बंडानंतर गेले काही दिवस राज्यात सध्या हाच चर्चेचा विषय झालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० हून अधिक तर अपक्ष असे एकूण ५० च्या वर आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुंबईत बंड मोडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत सध्या खलबतं सुरु आहेत. अशा स्थितीत या सत्तासंघर्षाचे पडसाद उभ्या महाराष्ट्रात उमटत आहेत. ठिकठिकाणी एकनाथ शिंदे समर्थक तर उद्धव ठाकरे शिवसेना समर्थक पोस्टरबाजी, घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तर भाजपाची सत्ता यावी यासाठी काही ठिकाणी कार्यकर्ते देव पाण्यात घालून बसले आहेत.

ठाणे आणि पालघरमध्ये एकनाथ शिंदेंना समर्थन

ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांचना समर्थनाचे बॅनर दिसू लागले आहेत. माजी महापौर नरेश म्हस्के याचे नवीन ट्विट केले आहे. त्यात
“विश्वास पे अपणे खडे रहो ,अडे रहो…” असे लिहिलेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या भेटी वाढल्या आहेत. नरेश मस्के आणि गोपाळ लांडगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी भेट दिलेली आहे. शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पालघर मध्ये ग्रामीण भागात देखील बॅनर झळकले आहेत . तलासरी नगरपंचायत क्षेत्र तसेच डहाणू मध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे व धर्मवीर आनंद दिघे साहेबाची शिकवण पुढे नेणारे मान.एकनाथ शिंदे यांना मनापासून शुभेच्छा असा मजकूर बॅनर वर लिहण्यात आला आहे. पालघरच्या तलासरी,डहाणू सह मुंबई अहमदाबाद महामार्गावर हे बॅनर लावण्यात आले आहेत. पूर्वीचा ठाणे ग्रामीण आणि आताचा पालघर जिल्हा यामध्ये एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग असून या भागात एकनाथ शिंदे यांचा शब्द हा अंतिम मानला जातो .

नाशिककमध्ये शिवसैनिक-शिंदे समर्थक आमनेसामने

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यापाठोपाठ नाशिकमध्येही झळकले बॅनर लावण्यात आलेत. एकनाथ शिंदे समर्थकांकडून नाशिकमध्येही शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान शिवसेना समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थकांमधला वाद चिघळला होता.
शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या बॅनरला काळं फासल्याचा प्रकारही घडला.

हे सुद्धा वाचा

सांगलीचे शिवसैनिक एकनाथ शिंदेंसोबत

एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार. बाळासाहेब याचे कट्टर शिवसैनिक आहोत. आमचा बंड पक्षाविरोधात नाही तर राष्ट्रवादी विरोधात आहे. अशी भूमिका स्थानिक शिवसैनिकांनी घेतलेली आहे. सांगलीच्या इस्लामपूर मध्ये पालकमंत्री जयंत पाटील हे दुजाभाव करतात. शिवसेनेची गळचेपी करत आहेत. वारंवार आम्ही पक्षाला सांगितले आहे पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशी तक्रारही करण्यात आली आहे. शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी हे सांगितले आहे.

साताऱ्यातही एकनाथ शिंदेंना समर्थन

सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले असुन यावर सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे यांना आमचं समर्थन असल्याचे फ्लेक्स लागले आहेत. साता-यातील शिवसैनीकाने हे बॅनर लावले असुन एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयाला समर्थन मिळताना पहायला मिळतय एकनाथ शिंदे यांचं गाव हे सातारा जिल्ह्यात येतं यामुळे शिंदेंना माणनारे‌ अनेक शिवसैनिक या जिल्ह्यात आहेत. तसेच शिवसेनेचे दोन दिग्गज आमदार गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि आमदार महेश शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असुन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडाची भुमिका घेतली आहे यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा समर्थनार्थ बॅनर झळकवून आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असल्याचं दर्शवून दिलय.

हिंंगोलीत शिंदेंना बाळासाहेबांची शपथ, परत या

हिंगोलीत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचे हिंगोलीत येताच शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून हिंगोलीत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी , फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. या वेळी बोलताना बांगर यांनी शिंदेंसह गेलेल्या आमदारांना परत येण्यासाठी बाळासाहेबांची शपथ घालत वापस येण्याची विनवणी केली आहे.

जळगावात उद्धव ठाकरेंना पाठिंबा

खून दिया है जान भी देंगे उद्धव साहब तुम्हारे लिये, अशी पत्रे स्वताच्या रक्ताने शिवसैनिकांनी लिहिली आहेत. भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रक्ताने माखलेला पत्र लिहीत, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना घेऊन महाराष्ट्रात परत यावं ही मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

उस्मानाबादमध्ये एकनाथ शिंदेंना पाठिंबा

आमदार तानाजीराव सावंत यांच्या समर्थक शिवसैनिकांची बैठक पार पडली. यात तानाजी सावंत यांची भूमिका योग्य आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचा निर्णय घेण्यात आला. परंडा मतदार संघात तानाजी सावंत यांना वाढता पाठिंबा असल्याचे दिसले. आमचा उद्धव ठाकरे यांना विरोध नाही मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर राहण्याला विरोध असल्याचे शिवसैनिक सांगत आहेत. स्थानिक स्तरावर राष्ट्रवादीकडून खच्चीकारण केल्याने शिवसैनिक नाराज आहेत.

सिंधुदुर्गात भाजपासाठी होमहवन

एकीकडे राज्य सरकार डळमळीत होण्याच्या मार्गावर असताना सिंधुदुर्गात मात्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून होमाचे आयोजन करण्यात आले. भाजपचे सरकार यावे व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सिंधुदुर्ग भाजपकडून सावंतवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात धार्मिक कार्य करून होम करण्यात आला.