चेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका मोरेला डिस्चार्ज

| Updated on: Sep 26, 2020 | 6:09 PM

कुर्ला येथे राहणाऱ्या 24 वर्षीय मोनिका मोरे हिच्यावर चेन्नई येथून विशेष विमानाने हात आणून दोन्ही हातांची यशस्वी प्रत्योरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे (Successful transplantation of both hands in Mumbai).

चेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका मोरेला डिस्चार्ज
Follow us on

मुंबई : कुर्ला येथे राहणाऱ्या 24 वर्षीय मोनिका मोरे हिच्यावर चेन्नई येथून विशेष विमानाने हात आणून दोन्ही हातांची यशस्वी प्रत्योरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे (Successful transplantation of both hands in Mumbai). आज (26 सप्टेंबर) 4 आठवड्यांनंतर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातून तिला डिस्चार्ज देण्यात येत आहे. तिच्यावर 28 ऑगस्टला तब्बल 16 तास दोन्ही हातांची यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ती 6 वर्षानंतर पुन्हा स्वांवलंबी जीवनाचा प्रयत्न करणार आहे.

2014 मध्ये घाटकोपर येथील रेल्वे अपघातात मोनिकाने तिचे दोन्ही हात गमावले होते. तिने सुरुवातीला काही महिने कृत्रिम हातांच्या सहाय्याने आपले दैनंदिन आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. पंरतू हे हात प्रत्यक्षात निरुपयोगी असून ते एकप्रकारे भारच आहे, असं तिला जाणवू लागलं. 2 वर्षांपूर्वी तिने मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दोन्ही हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली.

अनेक प्रसंग असे आले की त्यावेळी मोनिकाला अवयव दात्यांकडून हात उपलब्ध होऊ शकले असते. मात्र, मेंदू मृत व्यक्तिच्या कुंटूंबियांकडून हात दान करण्यासाठी कोणी तयार होत नसल्याने ही शस्त्रक्रिया रखडली होती. परंतु, चेन्नईतील 32 वर्षीय मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानामुळे मोनिकाला नवीन हात मिळाले आहेत. चॉर्टड विमानाने हे हात मुंबईत आणण्यात आले. रात्री उशीरा या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. साधारणतः 16 तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मोनिकाला आज डिस्चार्ज देण्यात आला.

मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले, “हात मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मोनिकाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण रखडले होते. पण आता हात मिळाल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हातांचे प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात एका वेगळ्या रुममध्ये ठेवण्यात आले होते. तसेच तिची काळजी घेण्यासाठी विलगीकरणासह एका नर्सची नियुक्ती देखरेखीसाठी करण्याची आवश्यकता होती. दोन्ही हातांना नियमित मलमपट्टी करण्यात आली. प्रत्यारोपणाच्या तिसऱ्या दिवशी ती आपल्या खांद्याचा आधार घेऊन चालू व बसू लागली. याशिवाय दिवसातून दोनदा तिला फिजिओथेरपी दिली जात होती. हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी हाताच्या कोपऱ्यापर्यंत प्लास्टर करण्यात आला आहे.”

डॉ. सातभाई पुढे म्हणाले, “येत्या काही आठवड्यांत तिला कोपर हलवायला सांगितले जाईल. याशिवाय हात आणि बोटांनी 3-4 महिन्यांनंतर हालचाल सुरु होणे अपेक्षित आहे. तिच्या हाताचे स्नायूतील टिश्यू आणि हाड तोपर्यंत बरे होतील. रुग्णाला या काळात आपल्या दैनंदिन कार्यासाठी मदत घ्यावी लागेल. पण, एकदा तिच्या हातांची हालचाल आणि व्यायाम आणि फिजिओथेरपीव्दारे ती लवकरच अधिक स्वावलंबी होईल. तिच्या हातांच्या रिकव्हरीसाठी साधारण एक ते दिड वर्ष लागेल. हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला आता 4 आठवडे पूर्ण झाले आहेत. मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिच्या फक्त गोळ्या सुरु आहेत. ती खुप चांगल्या प्रकारे पूर्ववत होत आहे. उपचारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. हे लक्षात घेऊन मोनिकाला आता घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरी गेल्यावरील तिला दररोज व्यायाम व फिजिथेरपी घेणं गरजेचं आहे.”

हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे मोनिकाला संसर्गाची शक्यता असल्याने कुटुंबियांना तिला भेटायला देता येत नव्हते. अशा स्थितीत कुटुंब तिच्याशी फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते. तसेच संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी तिला घरीही काही महिने वेगळे ठेवणे गरजेचे आहे. तसेच, कोरोना काळात पुर्णता काळजी घेत कोणत्याही सामाजिक अथवा गर्दीच्या वेळी बाहेर जाण्यास मनाई आहे.

रुग्ण मोनिका मोरे म्हणाली, “मला नवीन हात मिळतील, असा माझा ठाम विश्वास होता. आता माझं स्वप्न पूर्ण झाल्याने मी खूप आनंदी आहे. हात गमावल्याने कोणाच्याही लग्नात मला हाताला मेहंदी लावता येत नव्हती. पण आता मी पुन्हा मेहंदी लावू शकेन. याशिवाय, चित्र काढणे, आंघोळ करणे, स्वयंपाक आणि केस बांधणे ही काम मी स्वतः करु शकेन, याचा मला आनंद आहे. मला मिळालेल्या या नवीन आयुष्यासाठी माझे कुटुंबीय, अवयवदाता आणि डॉक्टरांचे मी आभार मानते.”

ग्लोबल रुग्णालयातील (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले, “चेन्नईमधील एका ब्रेनडेड व्यक्तीने हात दान केल्याने मोनिकाला नवीन आयुष्य मिळाले आहे. महाराष्ट्रातील ही पहिली यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. मला आशा आहे की ही यशस्वी शस्त्रक्रिया इतर अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी नवी आशा निर्माण करेल. विशेषत: अन्य अवयवांसह हात दान करण्यासाठीही लोक पुढाकार घेतील.”

संबंधित बातम्या :

मिरा रोडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया, मणक्यातून काढला 3.5 सेंमीचा ट्यूमर

सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल, जीवाची बाजी लावून दीड महिन्याच्या कोरोनाबाधित बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया

किडनीचं वजन पाहून डॉक्टरही अवाक, भारतातील पहिली दुर्मिळ शस्त्रक्रिया मुंबईत यशस्वी

Successful transplantation of both hands in Mumbai