अशा माणसाला चोप दिला पाहिजे, मनीषा कायंदे या अब्दुल सत्तारांना असं का म्हणाल्यात?
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सुमोटो गुन्हा दाखल केला पाहिजे.
मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवरची टीका केली. त्यानंतर सोशल मीडियामधून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राज्यात आंदोलन केली जात आहेत. 24 तासांचा अल्टिमेटम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलाय. सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा त्यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. याबाबत ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या, अशा प्रकारची शिवी देऊन सत्तार यांनी स्वतःची लायकी दाखविली. कोणतीही महिला असो. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करून तुमची संस्कृती दाखवून दिली आहे. तुमची लायकी दाखवून दिली आहे.
एकतर अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सुमोटो गुन्हा दाखल केला पाहिजे. लोकसभेच्या सचिवांनी सत्तारांना बोलवून घेतले पाहिजे. विचारणा केली पाहिजे. कारण खासदार महिलेबाबत असं बोलणं योग्य नव्हे. राज्याच्या विधान सभेत, विधान परिषदेत, लोकसभा, राज्यसभेत हक्कभंग दाखल केला गेला पाहिजे, अशा काही मागण्या आहेत. अशा माणसाला चोप दिला पाहिजे, अशा भावना माझ्या मनात येत आहेत, असंही मनीषा कायंदे यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, महिला म्हणून मला संताप आला आहे. हे महिलांना काय न्याय देणार आहेत. यांना निर्लज्ज म्हणू की काय. लोकं कंटाळले आहेत. यांनी गद्दारी केली. पाठीत खंजीर खुपसला. शेतकरी, सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही. लोकांनी शिव्या घातल्या तर त्यात काही नवल नाही. संतोष बांगर, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार या तीन मंत्र्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी ही विकृत मनोवृत्ती आहे. यांना मानसिक उपचाराची गरज आहे. असं मत मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलं.