मुंबई: विधानसभेत काल विद्यापीठ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनंगटीवार यांनी या विधेयकातील एका नियमावरून राज्य सरकारला अक्षरश: धारेवर धरलं. समलैंगिक, अलैंगिक आणि आंतरलिंगी संबंध असणाऱ्या सदस्याला सिनेटवर घेण्याचा नियम करण्यात आला आहे. एखादा व्यक्ती समलैंगिक, आंतरलिंगी आणि अलैंगिक संबंध ठेवणारा आहे हे कोण सिद्ध करणार? या व्यक्तीने माझ्याशी अलैंगिक संबंध ठेवले असं सर्टिफिकेट जनावरे देणार आहेत काय? असा संतप्त सवाल करतानाच सरकारला हे विधेयक मंजूर करण्याची एवढी घाई काय? असा सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
विधानसभेत काल विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून घमासान झाले. सुधीर मुनगंटीवार यांनी तर या विधेयकाची अक्षरश: पिसे काढली. सिनेट सदस्य कोण होऊ शकतो? याबाबतचे नवे नियम या अहवालात देण्यात आले आहेत. त्यावरून मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरले. या यादीत सदस्य कुणाकुणाला करता येईल याची माहिती दिली आहे. समलिंगी संबंध असणारी स्त्री, समलिंगी संबंध असणारा पुरुष यांना सिनेट सदस्य करता येईल. उभयलिंगी संबंध असणारा पुरुष याला सदस्य करता येईल. तृतीय पंथी, समलिंगी संबंधाचे आकर्षण असणारा पुरुष, आंतरलिंगी, अलैंगिक व इतरांना सदस्य करण्याची तरतूद सरकारने केली आहे. अध्यक्ष महाराज, पण व्यक्ती समलैंगिक, उभयलिंगी, आंतरलिंगी आणि अलैंगिक आहे हे कोण सिद्ध करणार? तुम्ही सिद्ध करणार आहात? सर्टिफाईड कोण करणार आहे? व्हाईस चॅन्सलर? व्हाईस चॅन्सलर नियुक्ती करताना असं लिहून देणार आहेत का की, याला समलिंगी संभोगाचे आकर्षण आहे. तुमच्यापैकी कोण अधिकारी सिद्ध करणार आहे? कोण सिद्ध करणार अध्यक्ष महाराज? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
मला समलैंगिक संबंध ठेवण्याचे आकर्षण आहे असं कोणी व्यक्ती लिहून देईल काय? कोण सिद्ध करणार आहे सचिव? मंत्री? राज्यमंत्री? कोण सिद्ध करणार आहे? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य करणार आहात. काही तरी गांभीर्य ठेवा. तरीही म्हणता याच्यावर संयुक्त चिकित्सा समिती बसवायची नाही. यात तर अलैंगिक संबंध असाही उल्लेख केला आहे. या अलैंगिक संबंधाची कुणी अजून परिभाषा सांगितली नाही. म्हणजे एखाद्या जनावरासोबत तुम्ही अलैंगिक संबंध ठेवला तर तो सदस्य होणार. म्हणजे ते जनावर सर्टिफाईड करून देणार आहे का यांनी माझ्याशी संबंध ठेवला म्हणून?, असा सवाल त्यांनी केला.
आपण काय कायदे करत आहोत. काही चर्चा करणार आहोत की नाही? एवढा हट्ट… हे बिल आणलंच पाहिजे. चर्चा नका करू, बिल पास करा. मतदान झालं म्हणजे आम्ही जिंकलोच पाहिजे… हा हट्ट कशासाठी. अध्यक्ष महाराज हे बिल आहे. हा बिलाचा भाग आहे. कोण सिद्ध करणार? या व्यक्तीला समलैंगिक संबंधाचं आकर्षण आहे, असं मंत्री उदय सामंत असं सिद्ध करणार आहेत? काय सुरू आहे? तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हे बिल थोडसं राखून ठेवा. आजपर्यंत देशाच्या शिक्षण व्यवस्थेची वाट लागली आहे ना… करू ना चर्चा. सर्व मिळून आपण चर्चा करू. तुम्ही सांगता विद्ववान लोकांनी अहवाल दिला. पण कोण काय आहे हे सिद्ध कोण करणार? काय यंत्रणा आहे आपल्याकडे? मी याला सदस्य नियुक्त केलं. याच्या चेहऱ्यावरून… त्याचे हावभाव असे वाटतात की याला समलैंगिक संबंधाचं आकर्षण आहे, असं कुलगुरू लिहून देणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या क्षणाला हे बिल न घेता. पुढच्या अधिवेशनात बिल घेऊ. देशाचे समित्यांचे आणि आंतरराष्ट्रीय अहवाल वाचून निर्णय घेऊ. जे ठरवताच येत नाही त्याचा अट्टाहास करता कामा नये. हट्ट करू नका. पुढच्या अधिवेशनात अभ्यास करू. कायद्याला ना नाही. पण आताच करा हा अट्टहास कशाला?, असं सांगतानाच आदित्यजी, तरुणांच्या प्रगतीसाठी जसे तुम्ही आग्रही आहात तसे आम्हीही आहोत. या कामात आमची तुम्हाला साथ आहे. शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल व्हावा आम्हालाही वाटतं. सत्तेसाठी आपण कधी एकत्र येणार नाही, पण कमीत कमी राज्याच्या प्रगतीसाठी एकत्र येऊ ना. आता हे बिल राखून ठेवा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या मुनगंटीवार यांच्या आक्षेपाला उत्तर दिलं. सर्वोच्च न्यायालयाने सर्वांना समान संधी द्यावी असं म्हटलं आहे. सदस्य होताना कोणती विद्ववान लोकं असावीत हे बिलात म्हटलं आहे. पण एकच बाजू दाखवून त्याचा विपर्यास केला जात आहे. असा कायदा फक्त महाराष्ट्रात होतोय असा भाग नाही. अनेक राज्यात हे कायदे झाले आहेत. त्यात काही नवीन नाही. त्याची माहितीही माझ्याकडे आहे. सर्वांना समानसंधी मिळावी हा त्यामागचा हेतू आहे. पत्रकारापासून पीएचडी झालेल्या व्यक्तीलाही सिनेटवर घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे, असं सामंत म्हणाले.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 29 December 2021#Fastnews #news #headlinehttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/Wwwbnp78aS
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: दोन घेत, चार देत, अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिवेशन पार पडलं, अजित पवारांच्या भूमिकेवर भाष्य
रिलायन्समध्ये होणार नेतृत्वबदल; मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?
नीतेश राणेंना जेल की बेल, आज दुपारी फैसला, अटकेची टांगती तलवार कायम, पण नीतेश आहेत कुठं?