Sulochana Latkar: अमिताभ, धर्मेंद्र आणि दिलीप कुमार यांची ऑन स्क्रिनवरील आई हरपली; चित्रपटसृष्टीवर शोककळा…
अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये अनेकवेळा त्यांच्याबाबत आदराने आणि भावूकपणे लिहिले होते. सुलोचना लाटकर यांनी सुमारे 250 हिंदी आणि अनेक मराठी चित्रपटांमधून काम केले आहे.
मुंबई : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीवर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे आज निधन झाले. त्यांचे निधन झाल्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.त्या 94 वर्षाच्या होत्या.दादरच्या सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. अभिनेत्री सुलोचना लाटकर या गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यानंतर त्यांच्यावर बराच काळ रुग्णालयात उपचार सुरू होते. अभिनेत्री सुलोचना यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या सुनेकडून सांगण्यात आले.
सुलोचनादीदी यांचे पार्थिव उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत त्यांच्या प्रभादेवी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुलोचनादीदी यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मराठा तितुका मेळावा’, ‘मोलकरीण’, ‘बाळा जो रे’, ‘सांगते ऐका’, ‘सासुरवास’, ‘वहिनीच्या बांगड्या’ हे त्यांच् मराठी गाजलेले मराठी चित्रपट होते. त्याचबरोबर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधूनही काम केले होते.
मराठी चित्रपटातून त्यांनी ज्या प्रमाणे आईची भूमिका साकारली होती, त्याच प्रमाणे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आई या भूमिकेला एक वेगळे वलय प्राप्त करुन दिले होते.
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 4, 2023
त्यांनी अनेक चित्रपटांमधून ज्येष्ठ अभिनेता अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारली आहे. त्यांच्या हिंदी चित्रपटातून ‘रेश्मा और शेरा’, ‘मजबूर’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटांचा समावेश आहे. मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील त्यांच्या आईच्या भूमिकेमुळे अमिताभ आणि सुलोचनादीदी यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.अमिताभसोबतच त्यांनी दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासोबतही काम केले आहे.
अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये अनेकवेळा त्यांच्याबाबत आदराने आणि भावूकपणे लिहिले होते. सुलोचना लाटकर यांनी सुमारे 250 हिंदी आणि अनेक मराठी चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या आईच्या भूमिकेमुळे त्यांचे भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण झाली होती.