महायुतीचा जागावाटपाबाबत सुनील तटकरे यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती, पडद्यामागे जोरदार हालचाली
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही. जागावाटपाचा तिढा नेमकं कधी सुटेल? याबाबत सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलीय. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर येऊ शकतो.
मुंबई | 19 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटताना दिसत नाहीय. हा तिढा सोडवण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालाचाली घडत आहेत. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या दिल्लीत बैठका पार पडत आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय कधी पूर्ण होईल? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. “महायुतीच्या जागावाटपाबद्दल गेल्या आठवड्यात आमच्यामध्ये चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. सन्मानपूर्वक जागावाटपाची चर्चा सुरू आहे. जवळपास 80 टक्के काम संपलेलं आहे. आम्ही आज दिल्लीला जाणार होतो. मात्र काही कारणास्तव रद्द झालं. पण उद्या दिल्लीमध्ये या विषयावर अंतिम चर्चा होईल”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
“महायुती पूर्ण क्षमतेने आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज होईल. सन्मानपूर्वक जागा या शिवसेना, राष्ट्रवादी आणि घटक पक्षाला देण्याबाबत भारतीय जनता पक्षाकडून पूर्णपणे अनुकूलता आहे. ही निवडणूक राष्ट्रहीत नजरेसमोर ठेवून आम्ही लढत आहोत. त्यावेळी राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती सामोरे जाण्यासाठी समर्थपणे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयक करणं या सर्व गोष्टीची जबाबदारी मनामध्ये ठेवत आज आम्ही पूर्णपणाने त्या ठिकाणी उतरत आहोत”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
माढा लोकसभा मतदारसंघाच्या वादावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “रामराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत. दीर्घकाळ त्यांनी मंत्रिमंडळात काम केले. त्यांची भूमिका पक्षश्रेष्ठींच्या कानावरती घातली. उद्या चर्चेच्या माध्यमातून भेटू. त्यावेळी योग्य तो समन्वयाचा मार्ग त्या ठिकाणी निश्चितपणाने काढला जाईल. विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आहेत. त्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही”, असं सुनील तटकरे म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया
यावेळी सुनील तटकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही प्रतिक्रिया दिली. “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी आदरपूर्वक सन्मान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जी भूमिका घेतली, राष्ट्रीय निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष यांनी जो निर्णय दिला आणि आमच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. आम्ही घेतलेल्या निर्णयाला न्यायव्यवस्थेने अनुकूलता दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून हा निकाल आम्ही स्वीकारतो आहे”, असं तटकरे म्हणाले.
“शरद पवार हे आमचे सर्वांचे दैवत आहेत ती भूमिका आम्ही कधी बदलली नाही. दादाच्या समर्थनार्थ आम्ही जो निर्णय घेतला त्यामधून सुद्धा आम्ही तसूभर पाठीमागे हटणार नाही. हे एक षडयंत्र आहे अजित पवार यांना बदनाम करायचं. बारामतीकर अजितदादांना कुटुंबातील घटक मानतात. आम्हाला विश्वास आहे. तमाम बारामतीकर अजित पवार यांच्या पाठीमागे निश्चित उभे राहतील”, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.