‘देवगिरी’वर खलबतं सुरु असतानाच नवाब मलिकांची एन्ट्री, बैठकीत काय-काय घडलं?

| Updated on: Dec 26, 2023 | 10:14 PM

राष्ट्रीवदी काँग्रेसच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे अजित पवार गटात सुरु असलेल्या घडामोडींची तर चांगलीच चर्चा सुरु आहे. नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे. पण तरीही आज अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरु असताना तिथे नवाब मलिकांची एन्ट्री झाली.

देवगिरीवर खलबतं सुरु असतानाच नवाब मलिकांची एन्ट्री, बैठकीत काय-काय घडलं?
Follow us on

निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 26 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी पक्षांमध्येदेखील अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाप्रमाणेच समसमान जागावाटप हवं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील सर्वांना सारखा न्याय मिळायला हवा, अशी भूमिका कॅमेऱ्यासमोर मांडली आहे. त्यामुळे पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. विशेष म्हणजे ही बैठक सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकही देवगिरी निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. या बैठकीनंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली, याविषयी थोडक्यात माहिती दिली.

“बैठकीत संघटनात्मक बाबतीत चर्चा झाली. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना काय चर्चा करावी? यासाठी ही बैठक झाली. राष्ट्रवादीचा 6 जानेवारीला मुंबईत मेळावा आहे. त्याची चर्चा देखील आता केली. आम्ही उद्या पण समीर भुजबळ यांना भेटून आयोजनाची तयारी करू. याबाबत पुन्हा एकदा चर्चा होईल”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

‘अमित शाह यांच्यासोबत अजित पवारांची चर्चा होणार’

“लोकसभेच्या संबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा होईल. पहिल्या आठवड्यात आणखी सविस्तर चर्चा होईल. राष्ट्रवादी पक्ष म्हणून काय वाटतं ते नेत्यांसमोर मांडू. समसमान जागावाटप असं काही नाही. आमचं सर्वांच उद्दिष्ट 45 पेक्षा जास्त निवडून आणण्याचं आहे”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

सुनील तटकरे नवाब मलिक यांच्याबाबत काय म्हणाले?

यावेळी सुनील तटकरे यांना नवाब मलिक यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तटकरे यांनी भूमिका मांडली. “नवाब मलिक हे त्यांच्या मतदारसंघाच्या संदर्भात प्रश्न घेऊन आले होते. त्यावेळी मी मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांशी बैठकीत होतो. नवाब मलिक यांची अजित दादांशी चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.