राजकारणात आज मित्र असाल, उद्या नसाल, सुप्रीम कोर्टाचा भाजपला दणका, बीएमसी विरोधीपक्ष नेतेपद नाहीच
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे भाजपची मोठी हार झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी दिली. (Supreme Court Congress BMC )
मुंबई : मुंबई महापालिकेचे (BMC) विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्यावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केले. बीएमसीतील विरोधीपक्ष नेतेपद भाजपला मिळावे, या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. राजकारणात रोज हेच होते. आज आपण कोणाचे मित्र असू, तर उद्या त्याचे मित्र नसू, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. (Supreme Court slams BJP Congress to remain BMC opposition Party leader)
मुंबई महापालिकेत भाजप दुहेरी भूमिका घेत असत. आधी पहारेकरी होते, आता विरोधी बाकावर बसण्याचा प्रयत्न होता. मात्र सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे भाजपची मोठी हार झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी दिली.
भाजपने मुंबई महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असल्याने आपल्याला विरोधी पक्षनेते पद मिळावे, अशी मागणी आधी हायकोर्टात केली होती. तेव्हा हायकोर्टाने ती मागणी नाकारली होती. त्यानंतर भाजपने सुप्रीम कोर्टात याबाबत अर्ज केला होता. मात्र ही याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1
(Supreme Court slams BJP Congress to remain BMC opposition Party leader)
काँग्रेसची स्वबळाची भाषा
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुका शिवसेनेच्या साथीने लढवण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर बीएमसी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेसकडून नुकतीच करण्यात आली आहे.
शिवसेना काय निर्णय घेणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना मुंबई महापालिकेतील 227 पैकी दोनशेहून अधिक जागा दशकानुदशकं स्वबळावर लढवत आली आहे. त्यामुळे यंदा शिवसेना पूर्णपणे स्वबळावर लढणार, की राष्ट्रवादीशी घरोबा करणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
“म्हणून काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा”
“मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष नवीन आहेत. त्यामुळे ‘एकला चलो रे’ हा नारा देऊन ते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावतील. मुंबईच्या काही पट्ट्यांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे तेही 80-100 जागांच्या खाली तडजोड करणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडीत सामावून घेणं सोपं जाणार नाही. आघाडी करुन आम्ही 150 च्या आसपास जागा लढवल्या, तर 114 हा बहुमताचा आकडा स्वबळावर गाठणं आम्हाला कठीण जाईल” असं संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?
मुंबई मनपा स्वबळावर लढणार, बिनधास्त नाना पटोलेंची बेधडक घोषणा
(Supreme Court slams BJP Congress to remain BMC opposition Party leader)